राज्यात २५ डिसेंबरला सुशासनदिन व मनुस्मृती दहनदिन

केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर, संघपरिवारातील किंवा भाजप नेत्यांच्या नावाने अनेक योजना सुरू करण्यात आल्या.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

राज्यातील युती सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिवस सुशासनदिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. तर, गेल्या पंधरा वर्षांपासून आंबेडकरवादी पक्ष, संघटना दर वर्षी हा दिवस मनुस्मृती दहनदिन म्हणून साजरा करतात. त्यानुसार आता यंदापासून दर वर्षी २५ डिसेंबरला एकाच दिवशी सुशासनदिन व मनृस्मृतीदहन दिन साजरे होतील.

केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर, संघपरिवारातील किंवा भाजप नेत्यांच्या नावाने अनेक योजना सुरू करण्यात आल्या. आता देशाचे माजी पंतप्रधान वाजपेयी यांचा वाढदिवस राज्यात सुशासनदिन म्हणून साजरा करण्याचा फतवा काढला. ख्रिश्चन धर्मियांचा २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस हा महत्त्वाचा सण मानला जातो. त्यादिवशी सार्वजनिक सुटी असते. त्याच दिवशी शासकीय स्तरावर सुशासनदिन साजरा करण्याचे परिपत्रक काढण्यात आल्याने ख्रिश्चन धर्मीयांमध्ये नाराजी पसरली होती. तर एका हक्काच्या सुटीवर पाणी सोडावे लागणार म्हणून, शासकीय अधिकारी-कर्मचारी अस्वस्थ झाले होते. मात्र २५ डिसेंबरची सुटी रद्द केलेली नाही, असा खुलासा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला. आता सुटी असेल, तर मग शासनाच्या परिपत्रकानुसार सुशासनदिन म्हणून माहिती अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण, तणावमुक्ती, सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी, इत्यादी कार्यक्रम सरकारी कार्यालयांमध्ये कसे साजरे करायचे, असा प्रश्न अधिकारी-कर्मचाऱ्यांना पडला आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षांपासून तो दिवस मनुस्मृती दहनदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी मुख्य कार्यक्रम पंढरपूर येथे होणार आहे, शिवाय राज्यातील सर्वच जिल्ह्यांमघ्ये मेळावे, सभा घेऊन हा मनुस्मृती दहनदिन साजरा केला जाणार आहे.
– ज.वि.पवार, दलित चळवळीचे अभ्यासक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 25 december ex pm birthday and manusmriti dahan din

ताज्या बातम्या