गुप्तचर विभागाने मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून साडेसहा कोटी रुपये किंमतीचे तब्बल २५ किलो सोने जप्त केले. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
दुबईहून मस्कतमार्गे मुंबई विमानतळावर आलेला प्रवासी मोहम्मद अबुबकरच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याजवळ प्रत्येकी एक किलो वजनाच्या १३ लगडी आणि प्रत्येकी १० तोळे (१०० ग्रॅम) वजनाच्या दोन लगडी जप्त आढळून आल्या. या सोन्याची किंमत ३.३९ कोटी रुपये आहे. तर दुबईहूनच आलेला आणखी एक प्रवासी माविन किझिल मोहम्मद अस्लम याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्रत्येकी १ किलो वाजनाच्या १२ लगडी आणि प्रत्येकी १० तोळे वजनाच्या दोन लगडी  आढळून आल्या. या सोन्याची किंमत ३.१४ कोटी रुपये आहे.
या दोन्ही प्रवाशांनी आपल्या बॅगेत आणि खिशात सोने ठेवले होते. सीमा शुल्क विभागाची तपासणी टाळण्यासाठी त्यांनी गळ्यात ओळखपत्र अडकवले होते. आपण विमानतळावरीलच एखाद्या विभागाचे कर्मचारी आहोत असे ते भासवत होते. मात्र त्यांचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे आम्ही त्यांच्या सामानाची तपासणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांनी गळ्यात अडकवलेले ओळखपत्र म्हणजे त्यांचा वाहन चालक परवाना होता. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून, त्यांनी हे सोने कुणासाठी आणले याचा शोध आम्ही घेत आहोत, असे गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले.
विमानतळावर एकाच दिवसात जप्त करण्यात आलेला सोन्याचा हा सर्वात मोठा साठा असल्याचा दावा त्यांनी केला.