मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा आरक्षित झालेल्या असताना एसटी महामंडळाने जादा गाडय़ा सोडण्याची तयारी केली आहे. यंदा गणेशोत्सवनिमित्त कोकणासाठी एसटी महामंडळाने अडीच हजार जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा सोडल्या जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

 या गाडय़ांचे आरक्षण तिकीट खिडक्या, एसटी महामंडळाचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप आणि एसटी महामंडळाकडून नियुक्त एजण्टकडूनही मिळणार आहे. या जादा गाडय़ांव्यतिरिक्त ग्रुप आरक्षणासाठीही लवकरच एसटी उपलब्ध केल्या जातील. या गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाल्यास अधिक गाडय़ा सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे. यंदा गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. अनेक जण साधारण चार ते पाच दिवस आधीच गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा रेल्वेगाडय़ांमधील आरक्षण क्षमता संपल्यामुळे थांबवण्याची वेळ आली. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा गाडय़ांची घोषणा करून दिलासा दिला आहे.

प्रतीक्षा यादी

गणेशोत्सवकाळात मुंबईहून जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या, जनशताब्दी, दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मडगाव डबल डेकर या गाडय़ांच्या काही श्रेणींना मोठी प्रतिक्षा यादी आहे. तर गणेशोत्सव संपताच पुन्हा परतीच्या प्रवासाचेही आरक्षण आता उपलब्ध नाही.

गाडय़ा कुठून?

मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला नेहरु नगर, पनवेल,उरण, खोपट, वंदना, विठठ्लवाडी, कल्याण, नालासोपारा, वसई, अर्नाळा येथून गाडय़ा सुटतील.

जाण्यासाठी..

पहिल्या टप्प्यात २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा गाडय़ांचे आरक्षण शनिवार, २५ जूनपासून सुरू होणार आहे. जादा गाडय़ा मुंबई, ठाणे, पालघर मधून उपलब्ध केल्या जातील. गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाडय़ा कोकणात रवाना होतील.

येण्यासाठी..

५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाडय़ा कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. त्यासाठी ५ जुलैपासून परतीच्या गाडय़ांचे आरक्षण करता येईल.