केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दळवळणमंत्री रवी प्रसाद यांची माहिती
केंद्र सरकारच्या ग्राम बीपीओच्या माध्यमातून राज्यात २५०० रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत, तर संपूर्ण देशात ४८ हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक उमेदवारामागे एक लाख रुपये इतके अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दळवळणमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
ग्रामीण भारतात माहिती तंत्रज्ञानाचे जाळे पसरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘ग्रामीण बीपीओ’ ही योजना आणली आहे. ही योजना सध्या देशात आयटी हब असलेले बेंगळुरू, पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता या शहरांना वगळून लागू राहणार आहे. या योजनेसाठी सरकारने ५०० कोटींची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात २५०० रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रसाद यांनी मुंबईतील इंडियन र्मचट चेंबर येथे आयोजित ‘माहिती तंत्रज्ञान आणि सायबर गुन्हे : भारतीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांपुढील आव्हान’ या विषयावरील परिसंवादात दिली. सर्वत्र डिजिटायझेशन होत असताना सायबर सुरक्षा हा कळीचा मुद्दा असणार आहे. सायबर गुन्हेगारांशी सामना करण्यासाठी भारतीय व्यवस्था सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडील माहिती सुरक्षित राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाने चोख कामगिरी करत हल्ले परतावून लावले.
सायबर प्रयोगशाळेत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
बेंगळुरू येथे सायबर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून तेथे न्यायाधीश, वकील यांच्यासह ५८० सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे प्रसाद यांनी सांगितले. प्रसाद यांनी या वेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती देत दोन वर्षांत सरकारने या क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2500 jobs opportunity by bpo
First published on: 09-06-2016 at 02:45 IST