दहीहंडीचा उत्साह, बक्षिसांची घागर मात्र उताणी! ; आयोजकांकडून पारितोषिकांबाबत हात आखडता, गोविंदा पथकांचा हिरमोड होण्याची चिन्हे

अनेक गोविंदा पथकांनी गेल्या महिन्याभरात रात्र जागवून मानवी थर रचण्याचा सराव केला. 

दहीहंडीचा उत्साह, बक्षिसांची घागर मात्र उताणी! ; आयोजकांकडून पारितोषिकांबाबत हात आखडता, गोविंदा पथकांचा हिरमोड होण्याची चिन्हे
(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरे करण्याची संधी मिळाल्यामुळे उत्सवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांनी पारितोषिकांची उधळण करताना हात आखडता घेतला आहे. आठ थरांसाठी २५ हजार रुपये, तर सात थरांसाठी अवघे पाच हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आल्याने गोविंदा पथके बुचकळय़ात पडली आहेत.

गेली दोन वर्षे करोना संसर्गामुळे लागू कडक निर्बंधांमुळे गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. यंदा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे करोनाविषयक सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करता येणार असल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह आहे. अनेक गोविंदा पथकांनी गेल्या महिन्याभरात रात्र जागवून मानवी थर रचण्याचा सराव केला. 

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातल्यामुळे राजकारण्यांकडून मोठी आर्थिक मदत मिळेल, लाखमोलाच्या दहीहंडय़ा बांधण्यात येतील अशी गोविंदा पथकांना         अपेक्षा होती. मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेमक्या किती प्रभागांमध्ये होणार, प्रभाग आरक्षणाचे काय होणार, कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायला मिळणार असे अनेक प्रश्न उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक मंडळींनी उत्सवांसाठी हात आखडता घेतला आहे. राजकारण्यांकडून आर्थिक रसद मिळण्याची शक्यता नसल्यामुळे गोविंदांचा अपेक्षा भंग झाला आहे. गेली दोन वर्षांमध्ये झालेले नुकसान लक्षात घेता पुरस्कर्ते, देणगीदारांनीही हात आखडता घेतला आहे. त्याचा फटका गोविंदा पथकांना बसला आहे.  यंदा शिवसेनेतील बंडखोर, भाजप आणि शिवसेना नेतेमंडळी आणि अन्य आयोजक मंडळी मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतील असे पथकांना वाटत होते. मात्र मुंबईत फारशा मोठय़ा दहीहंडी बांधण्यात आलेल्या नाहीत. तर मोठय़ा दहीहंडय़ांच्या आयोजकांनी सामायिक रक्कमेतूनच उंच दहीहंडी फोडणाऱ्यांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आठ आणि त्यापेक्षा अधिक थर रचणाऱ्यांच्या पदरात पूर्वीप्रमाणे बक्कळ रक्कम पडण्याची शक्यता नाही.

थर वाढल्याने बक्षिसांत घट

दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी यंदा आठ थरासाठी २५ हजार रुपये, तर सात थरांसाठी अवघे पाच हजार रुपये पारितोषिक जाहीर केले आहे. मुंबईमधील बहुसंख्य गोविंदा पथके सात थर रचू लागले आहेत. तर अनेक पथके आठ थर रचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयोजकांनी पारितोषिकांची रक्कम कमी केली आहे. मात्र सात-आठ थर रचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गोविंदांची गरज भासते. गोविंदांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. दोन वेळचा नाश्ता, जेवण, टी-शर्ट, हाफ पॅन्ट, वाहनाची व्यवस्था आदींसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. यापैकी बहुतांश रक्कम दहीहंडी फोडल्यानंतर मिळणाऱ्या पारितोषिकांतून उभी करण्यात येते. परंतु यंदा पारितोषिकांची रक्कम कमी झाल्यामुळे पथके अडचणीत आली आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई- गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास; गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची बांधकाम मंत्र्यांची ग्वाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी