मुंबईत ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकी; वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेश, सुरक्षा यंत्रणा सतर्क | 26/11 attack traffic police control room security system alert | Loksatta

मुंबईत ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकी; वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेश, सुरक्षा यंत्रणा सतर्क

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘२६/११’सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे.

मुंबईत ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकी; वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेश, सुरक्षा यंत्रणा सतर्क
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवारी सुरक्षा वाढवण्यात आली असून, श्वान पथकाकडून तपासणी केली जात आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘२६/११’सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदेशानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

एका व्यक्तीकडून शुक्रवारी पावणेबाराच्या दरम्यान वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे अनेक संदेश आले. यामध्ये ‘२६/११’सारखा हल्ला करण्याची धमकीचा संदेश होता. दहशतवादी अजमल कसाब, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात ठार झालेला ‘अल-कायदा’चा प्रमुख अल-जवाहिरी याचा उल्लेखही असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. या धमकीच्या संदेशात सहा जणांचे मोबाइल क्रमांकही पाठवले असून, पाकिस्तानी मोबाइल क्रमांकावरून संदेश पाठवण्यात आले होते.

Mumbai Terror Attack: २६/११ मुंबई हल्ल्यासाठी सागरी चाचे आणि तस्करांशी दहशतवाद्यांची झाली होती हातमिळवणी!

यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखाही याप्रकरणी तपास करत आहे. त्याचप्रमाणे राज्य ‘एटीएस’ला देखील याबाबत कळविले असून, केंद्रीय तपास यंत्रणांनादेखील याची माहिती दिल्याचे फणसळकर यांनी सांगितले. मुंबईसह राज्यात सण-उत्सवाचे वातावरण आहे. त्याला गालबोट लागू नये याबाबत आम्ही गंभीर असून, मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास आम्ही तत्पर असल्याचे फणसळकर म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी एका संशयिताला विरार येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

विरारमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचा मोबाइल क्रमांक धमकीच्या संदेशात नमूद करण्यात आला होता. याशिवाय आणखी पाच मोबाइल क्रमांक धमकीच्या संदेशात होते. त्यातील एक मोबाइल क्रमांक उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत गायक सिद्धू मुसेवाला याच्या नावाचाही उल्लेख धमकीत करण्यात आला होता.

26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेमकं काय बदललं? आपण काय धडा घेतला?

धमकीच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला सतर्क केले आहे. सागरी सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले असून, ‘सागर कवच’ मोहीमदेखील सुरू आहे. प्रत्येक संदेशाची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नौका सापडल्याच्या पार्श्वभूमीवर या संदेशाची गंभीर दखल घेतली आहे.  

– विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई</p>

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-08-2022 at 00:02 IST
Next Story
सहा आठवडय़ांत तपासाचा प्रगती अहवाल सादर करा; पानसरे हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे एटीएसला आदेश