मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील पंधरा डबा लोकल प्रवास आणखी सुकर व सुसाट होणार आहे. पंधरा डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून सुरू असून २७ फेऱ्यांची भर लवकरच पडेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत पंधरा डबा लोकल सेवा होतात. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या सेवेचा विस्तारही पश्चिम रेल्वेने केला. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकांत प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार या दोन स्थानकांदरम्यान फलाटांची लांबी वाढविणे यासह अन्य तांत्रिक कामे पूर्ण केली आणि एप्रिल २०२१ मध्ये प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे पंधरा डबा लोकलच्या फेऱ्या वाढल्या. याआधी ५४ फेऱ्या होत होत्या. त्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढून ती ७९ पर्यंत पोहोचली. पंधरा डबा लोकलमुळे प्रवास सुकर होत असल्याने आणखी फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा डबा लोकलच्या आणखी २७ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय झाला असून त्याचे नियोजन होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यामध्ये चर्चगेट ते विरार, डहाणू जलद लोकल फेऱ्यांबरोबरच अंधेरी ते विरार धिम्या मार्गावरही फेऱ्या होतील. त्यामुळे सध्या ७९ असलेल्या फेऱ्यांची संख्या १०६ पर्यंत होणार असल्याचेही सांगण्यात आले. बारा डबा लोकल गाडय़ांना तीन डबे जोडून पंधरा डबा लोकल चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर मात्र प्रतीक्षाच

मध्य रेल्ंवेकडे दोन पंधरा डबा लोकल असून त्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर चालवल्या जात होत्या. त्याच्या २२ फेऱ्या होतात. पंधरा डबा लोकल वाढवल्यास त्या उभ्या करण्यासाठी जागेची कमतरता इत्यादींमुळे पंधरा डबा लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यास अडचणी येत असून त्या वाढवण्यासंदर्भात सध्या तरी मध्य रेल्वेकडून विचार करण्यात आलेला नाही.