मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये चार वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी तब्बल ३ कोटी ३७ लाखांहून अधिक रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसी येथे चार वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केले. यात बनारस-खजुराहो, फिरोजपूर-दिल्ली, लखनऊ-सहारापूर आणि एर्नाकुलम-बेंगळुरू या मार्गांचा समावेश आहे. ईशान्य रेल्वेच्या वाराणसी विभागाने उद्घाटन कार्यक्रमावर ३ कोटी ३७ लाख ९३ हजार ३५१ रुपये खर्च केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार अर्ज केला होता. या अर्जाच्या उत्तरात ईशान्य रेल्वेच्या वाराणसी विभागाने वरील माहिती दिली. ही रक्कम चार वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन समारंभावर खर्च करण्यात आली, असे ईशान्य रेल्वेच्या वाराणसी विभागाने उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
सध्या देशभरात १६० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्या धावतात. यामधील अनेक एक्स्प्रेस या ८, १६ आणि २० डब्यांच्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येते. सर्वात प्रथम १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिल्या दिल्ली – वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन समारंभावर ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये वाराणसीमध्ये चार वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनावर ३ कोटी ३७ लाख रुपये खर्च करण्यात आले.
यावरून प्रति एक्स्प्रेस ८४.५० लाख रुपये खर्च झाला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जावरील उत्तरात खर्चाची सविस्तर माहिती दिलेली नाही. फक्त एकूण रक्कम दिली आहे. सजावटीचे काम कोणत्या कंपनीला देण्यात आले हेही त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सुरक्षेवर किती खर्च झाला ? जाहिरात व इतर व्यवस्थांवर किती खर्च झाला ? हेही स्पष्ट झालेले नाही. प्रत्येक वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात निधीची उधळपट्टी करणे अपेक्षित नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाचे पैसे असे वायफळ खर्च करणे योग्य नसल्याचे अजय बोस यांनी सांगितले.
