खासगी व सरकारी रुग्णालयात गर्भपातासाठी सुविधा या असुरक्षित असल्यामुळे मुंबईतील ३ महिलांचा मृत्यू ओढवला आहे. संसर्गजन्य साधनांनी गर्भपात केल्यामुळे केईएम, भाभा या पालिका रुग्णालयांत तर वर्धन या खासगी रुग्णालयातील महिलांना गर्भपातानंतर जीव गमवावा लागला आहे.

माहितीच्या अधिकाराखाली चेतन कोठारी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळवली आहे. यामध्ये दिल्याप्रमाणे गर्भपातासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे ऑगस्ट २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ३ महिलांना गर्भपातानंतर जीव गमवावा लागला. मंजुळा वाघ (केईएम रुग्णालय), राणी राव (भाभा रुग्णालय) आणि किस्मतुनीसा शाह (वर्धन रुग्णालय) या महिलांना गर्भपातानंतर अधिक रक्तस्राव झाल्यामुळे आणि अर्धवट गर्भपातामुळे मृत्यू झाला. चेंबूर येथील पार्वतीदेवी मौर्य या महिलेचा मृत्यू घरात केलेल्या गर्भपातामुळे झाला आहे.

या माहिती अधिकारात दिल्याप्रमाणे गेल्या वर्षभरात ३२ हजारांहून अधिक गर्भपाताच्या घटना घडल्याचे नमूद केले आहे. तर २०१६ या वर्षांत १५ वर्षांखालील २७१ मुलींनी गर्भपात केल्याचे समोर आले आहे. तर कुटुंब नियोजनाची साधने फोल ठरल्यामुळे २९ हजार ७०० गर्भवती महिलांना गर्भपात करावा लागला आहे. यातील अधिकतर महिलांनी कुटुंब नियोजनाची साधने फोल ठरल्याची कारणे दिली आहेत. आजही कुटुंब नियोजनाची जबाबदारी ही महिलांवर टाकली जाते. मात्र महिलांच्या तुलनेत पुरुषांची नसबंदी ही सोपी व सुलभ असते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सांगितले.