मुंबई : उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या ३ वर्षीय विधि या अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस ५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया ७ ऑगस्टपर्यंत होणार आहे. पहिल्या फेरीच्या जागावाटपाची यादी ११ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
३ वर्षीय एलएलबी या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी ११ जूनपासून सुरू झाली होती. पहिली मुदतवाढ ८ जुलैपर्यंत देण्यात आली होती. यानंतर प्रवेश नोंदणीची दुसरी मुदतवाढ ९ ते १३ जुलैदरम्यान देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. या अभ्यासक्रमास एकूण ४८ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या फेरीसाठी ११ ऑगस्ट रोजी जागावाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कागदपत्राची पडताळणी आणि प्रवेश निश्चितीसाठी १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
