मुंबई : लालबाग उड्डाणपुलावर टॅक्सीच्या पुढे जात असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ती मुलगी आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रियांशी उमेश टाक (३) असे मृत मुलीचे नाव असून याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहे. दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथे अपघातात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
रियांशीही आई-वडिलांसोबत धारावी परिसरात राहण्यास होती. रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ती वडील उमेश आणि आई वैशाली यांच्यासोबत जात असताना दुचाकींचा लालबाग उड्डाणपुलावर अपघात झाला. त्यांना तात्काळ जवळच्या मसीना रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. टॅक्सीच्या पुढे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दुसऱ्या घटनेत, घाटकोपर येथील नालंदा बस थांब्यासमोर उभ्या असलेल्या प्रदीप मोतीराम घागरे (३१) या तरुणाला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.