मुंबई : मुंबईतील रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरातील गर्दीमुळे अनेक पालकांची लहान मुलांसोबत ताटातूट होते. तसेच काही अल्पवयीन मुले घरच्यांशी भांडण करून मुंबईत पळून येतात. ही मुले वाईट सवयीच्या आहारी जाऊन गैरकृत्य करू नये, यासाठी चाइल्ड हेल्प डेक्स आणि रेल्वे पोलीस सतर्कपणे काम करत आहेत. नुकताच दादर रेल्वे स्थानकात हरवलेल्या ३ वर्षीय बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर बालकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणेला मोठे यश आले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या दादर रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्कने रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ), रेल्वे पोलिसांच्या मदतीने एका ३ वर्षीय बालकाला अवघ्या काही तासांत त्याच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहचविले.वसई येथील रहिवासी असलेले प्रवासी आपल्या ३ वर्षीय मुलासह दादर पूर्व-पश्चिम पुलावरून प्रवास करत होते. दादर पुलावरील प्रचंड गर्दीमुळे मुलाची पालकांशी ताटातूट झाली. घाबरलेल्या पालकांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. मात्र मुलाचा शोध लागत नव्हता.

पालकांनी पुलाचा परिसर, स्थानक परिसर शोधून काढला. पण मुलगा कुठेही दिसला नाही. त्याच पुलावरून प्रवास करणाऱ्या एका सजग कुटुंबाला एक मुलगा रडताना दिसला. यावेळी त्याची विचारपूस करून, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरपीएफच्या मदतीने मुलाला दादर रेल्वे चाईल्ड हेल्प डेस्क येथे आणले.चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी चेतन कोळी, मधुरा खडपकर आणि वर्षा सुतार यांनी तत्काळ मुलाचा ताबा घेऊन त्याला धीर दिला. त्याचे रडणे थांबविले. तसेच चाइल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वेळ न घालवता रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुलावर शोधमोहीम राबवली. शोध घेत असतानाच समोरून त्याचे वडील कुमार धावपळ करताना दिसले. वडिलांना पाहताच चिमुकल्याने त्यांच्याकडे झेप घेतली. योग्य कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या समक्ष बालकाला अधिकृतपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला सुखरूप पाहून वडिलांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानके असलेल्या दादर, सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल या तीन महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत ”रेल्वे चाइल्ड हेल्प डेस्क” कार्यरत आहेत. संकटात सापडलेल्या किंवा हरवलेल्या बालकांना तातडीने मदत मिळवून देणे, हे या चाइल्ड हेल्प डेस्कचे मुख्य उद्दिष्ट आहे.