मुंबई : पसंतीचा वाहन क्रमांक मिळविण्याकडे वाहनधारकांची धडपड सुरू असते. नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू झाल्यानंतर सात दिवसांत २२९ अर्जदारांनी पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी केल्यामुळे आरटीओ विभागाच्या तिजोरीत सुमारे ३० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

वडाळा आरटीओमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉईंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. खासगी दुचाकी वाहनांची मालिका ‘एमएच ०३ इएम’ संपल्यानंतर दुचाकी वाहनांसाठी २ मेपासून ‘एमएच ०३ इएन’ ही नवीन मालिका सुरू करण्यात आली. नव्या मालिकेचा आकर्षक व पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी वडाळा आरटीओने नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज सादर केले. त्यानंतर पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे आकर्षक व पसंती क्रमांकासाठीचे शुल्क जमा केले. शुल्काचा भरून अर्जदारांनी क्रमांक आरक्षित केले. पसंतीनुसार ०००९, ०७८६, ०९९९ हे विशेष क्रमांक २० हजार रुपये शुल्क भरून आरक्षित करण्यात आले. तसेच तीन लाख ४४ हजार रुपये, एक लाख ८५ हजार रुपये, एक लाख १४ हजार रुपये, ७५ हजार रुपये, ६० हजार रुपये, २४ हजार रुपये व इतर विविध प्रकारचे शुल्क भरून १८७ आकर्षक व पसंती क्रमांक आरक्षित करण्यात आले आहेत. नागरिकांनी एकूण १८७ क्रमांक आरक्षित करून नऊ लाख ६२ हजार रुपये महसूल वडाळा आरटीओच्या तिजोरीत जमा केला आहे.

हेही वाचा >>>ठाणेकर अद्वैत नादावडेकरच्या कुंचल्यातून साकारली पंतप्रधानांची भेट, तैलचित्र ठरले लक्षवेधी

‘एमएच ०३ इएन’ या दुचाकी नवीन मालिकेमधून ०२०२, ०३००, ९९००, ०९०९, ३४५६, ९००९, ००५, ०००७, २७२७, ११११, चारचाकीसाठी पसंती क्रमांक आरक्षित करण्यास दोन लाख १० हजार रुपये, नऊ लाख रुपये, सहा लाख ७५ हजार रुपये, दोन लाख २५ हजार रुपये असे विविध शुल्क दराने ४२ पसंती क्रमांक आरक्षित केले. एकूण ४२ क्रमांक आरक्षित करून सुमारे २० लाख १० हजार रुपये महसूल जमा केला आहे. या नवीन मालिकेतून एकूण २२९ अर्जदारांकडून पसंती क्रमांसाठी २९ लाख ७२ हजार रुपये इतका महसूल ९ मेपर्यंत प्राप्त झाला आहे, अशी माहिती वडाळा आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.