मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उत्तर प्रदेशमधून उपचारासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ३० फायब्रॉईडच्या गाठी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये झालेल्या या गाठींमुळे अनेक दिवसांपासून तिच्या पोटात प्रचंड दुखत होते. त्याचप्रमाणे तिला कोणतेही काम करणे शक्य होत नव्हते. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या महिलेला जीवदान मिळाले आहे.
हेही वाचा >>>या निवडणुकीत मविआतून तुम्हाला छुपी मदत झालीय का? गुलाबराव पाटील म्हणाले, “आता आमच्या…”
उत्तर प्रदेशमध्ये राहत असलेल्या या महिलेच्या पोटामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुखत होते. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे ती तपासणीसाठी गेली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये मोठा गोळा असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यांनी तिला मोठ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले. मात्र ही शस्त्रक्रिया आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्यामुळे या महिलेने मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात धाव घेतली. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये मांसाचा मोठा गोळा असल्याचे दिसून आला. हा मांसाचा गोळा मोठ्या झाल्याने तिच्या मूत्रपिंडाकडे जाणाऱ्या वाहिन्या दाबल्या होत्या. परिणामी, तिच्या मूत्रपिंडावर ताण पडत होता. तसेच मूत्रपिंडाबरोबरच मूत्राशयावरही ताण पडत असल्याने या महिलेला प्रंचड त्रास होत होता.
हेही वाचा >>>भिडे वाडा प्रकरण : “सामोपचाराने प्रश्न मार्गी लावू अन्यथा…” राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
त्याचबरोबर पाय सूजणे, लघवीला त्रास होणे यासारख्या समस्यांनी ती त्रस्त झाली होती. मासिक पाळीच्या वेळी तिच्यामध्ये होत असलेल्या गुणसूत्रांमधील बदलांमुळे तिच्या गर्भपिशवीत गाठी झाल्याचे निदान झाल्याने डॉक्टरांनी तातडीने महिलेची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महिलेची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या गर्भामध्ये तब्बल ३० गाठी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्या गाठी बाहेर काढल्या, अशी माहिती स्त्रीरोग विभागाचे प्रमुख आणि मुंबई ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. निरंजन चव्हाण यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या पुन्हा विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या सहा ते सात दिवसांतच त्या महिलेला घरी पाठविण्यात आले.
मासिक पाळीदरम्यान त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नये
मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या स्त्रियांमधील गुणसूत्रांच्या बदलामुळे साधारणपणे १० पैकी चार महिलांमध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे महिलांना मासिक पाळीनंतर त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे, असा सल्लाहीडॉ. निरंजन चव्हाण यांनी दिला.