संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : पालिकेच्या शीव रुग्णालयात गेल्या दोन वर्षांतील करोनाकाळात हृदयरोग उपचार विभागात जवळपास शंभरहून अधिक ज्येष्ठ हृदयरुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. २०२० मध्ये एकूण १७३२ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात आल्या, तर जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या काळात आतापर्यंत १५२७ रुग्णांच्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात आल्या.

करोनाच्या पहिल्या काही महिन्यांत  नेमका अंदाज येत नव्हता. त्यातच टाळेबंदीमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होणे अवघड होऊन बसले होते. हृदयविकार रुग्णांना याचा मोठा त्रास झाला. कारण या रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असते आणि नेमक्या याच वेळी रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी व हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय नाथानी यांनी सांगितले.  पहिल्या दोन महिन्यांत आमच्याकडे जवळपास १९० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे या विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. या १९० रुग्णांमध्ये साठ वर्षांवरील २५ रुग्ण होते. दोन वर्षांत शंभरहून अधिक ज्येष्ठ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्या सर्वाची प्रकृती उत्तम आहे. शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत, तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत. सध्या दररोज २०० ते २५० हृदयविकाराच्या रुग्णांना बाह्य़रुग्ण विभागात उपचार केले जातात.