म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील गोरेगाव, सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पातील ३०६ घरांच्या विजेत्यांची घराची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मंडळाने ३०६ घरांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी गुरुवारी निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत कामाला सुरुवात करून विजेत्यांना घराचा ताबा देण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

सिध्दार्थ नगर पुनर्विकास २००८ पासून रखडला होता. सिध्दार्थ नगरमधील मूळ ६७२ रहिवासी १४ वर्षे बेघर आहेत. विकासकाने रहिवाशांसह म्हाडाचीही फसवणूक केली आहे. पुनर्वसित इमारतीसह म्हाडाच्या हिश्श्यातील इमारतीचेही काम विकासकाने केले नाही. मुंबई मंडळाला मिळणाऱ्या अंदाजे २७०० घरांपैकी केवळ ३०६ घरांचे काम सुरू केले. मात्र ते अर्धवट सोडून दिले. अशा अर्धवट काम झालेल्या आणि वादग्रस्त प्रकल्पातील ३०६ घरांचा समावेश २०१६ च्या सोडतीत म्हाडा प्राधिकरणाने केला. त्यासाठी विरोध असतानाही ही घरे सोडतीत घेण्यात आली.

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे”, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवरून संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; पेडणेकर म्हणाल्या, “सौ चूहे खाके…”

सोडत काढून सहा वर्षें पूर्ण झाली तरी अजून घरांच्या कामाला सुरुवात न झाल्याने ३०६ विजेते घराच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई मंडळाने २०१८ मध्ये हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला घरे मिळतील अशी अपेक्षा विजेत्यांना होती. मात्र मंडळाकडून अद्यापपर्यंत काम सुरू न झाल्याने ही अपेक्षा खोटी ठरली. आता मात्र त्यांची घराची प्रतीक्षा संपणार आहे. आता दोन महिन्यांत अपूर्ण इमारतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : मुंबई : पालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

फेब्रुवारीमध्ये अपूर्ण पुनर्वसित इमारतींच्या कामाला मंडळाने सुरुवात करून रहिवाशांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला. मात्र सोडतीतील ३०६ घरांचे काम रखडलेलेच होते. आता मात्र या घरांच्या कामालाही सुरुवात होणार आहे.
सोडतीतील ३०६ घरांच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येईल. काम सुरु झाल्यापासून दोन वर्षात काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्यात येईल अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.