scorecardresearch

उपनगरीय रेल्वेचे वर्षभरात ३२०० बळी!

जखमींची संख्याही तीन हजारांवर; वाहनांच्या संख्येत आठ टक्क्य़ांनी वाढ

Mumbai, Railway, local trains , mishap, मध्य रेल्वे, गाड्या उशिराने, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जखमींची संख्याही तीन हजारांवर; वाहनांच्या संख्येत आठ टक्क्य़ांनी वाढ

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेतून दर दिवशी ७६ लाख प्रवाशांची वाहतूक होते. मात्र प्रवासाच्या घाईत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. कधी प्रवाशाच्या तर कधी रेल्वेच्या चुकीमुळे होणाऱ्या रेल्वे अपघातांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल तीन हजार २०१ प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची तर तीन हजार ३६३ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. अपघात कमी करण्यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत अपघातातील मृत्यूच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर असे उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. २०५ गाडय़ांच्या माध्यमातून दररोज दोन हजार ८५५ फेऱ्यांद्वारे सरासरी ७६ लाख ३० हजार प्रवाशांची वाहतूक होते. उपनगरीय सेवा अधिक सुखकारक होण्यासाठी एमयूटीपीअंतर्गत सुरू असलेल्या काही प्रकल्पांपकी अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाच्या विस्ताराचे काम मेपर्यंत तर ठाणे- दिवादरम्यान अतिरिक्त पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्यात १ जानेवारी २०१७ रोजी दुचाकी, रिक्षा, कार, बस अशा सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या २ कोटी ९० लाख असून गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत २१ लाखांची म्हणजेच ८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक लाख लोकसंख्येमागे २४ हजार ४११ वाहने आणि प्रति किलोमीटर रस्त्यावर सरासरी ९८ वाहनांची वर्दळ असते.

राज्यातील एकूण वाहनांपकी १०.१ टक्के म्हणजेच २९.७ लाख वाहने एकटय़ा मुंबईत आहेत. मार्च २०१६ अखेर वाहने चालविण्याच्या वैध परवान्यांची संख्या तीन कोटी असून गेल्या वर्षांच्या तुलनेत त्यात ३.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात २५ लाख शिकाऊ परवाने देण्यात आले आहेत. राज्यात वर्षभरात मोटार सायकली, स्कूटर्समध्ये ८ टक्के, ऑटोरिक्षा २.५ टक्के, हलकी प्रवासी वाहने ८.८ टक्के, बसेस १०.६ टक्के, वाणिज्य वाहने ५.८ टक्के, रुग्णवाहिका ४.९ टक्के तर इतर वाहनांच्या संख्येत २०.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत दुचाकीच्या संख्येत ८.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांमध्ये ९.३ टक्के, बसेसमध्ये ६.७ टक्के, रुग्णवाहिकांमध्ये ६.८ टक्के वाढ  झाली आहे. राज्यात प्रति १० हजार वाहनांमागे झालेल्या अपघातांचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत कमी म्हणजेच २४ वरून १४ वर आले आहे. राज्यात विविध रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ८०३ तर मुंबईत ५१० लोकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यातील विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतूक १९.२ टक्क्यांनी वाढून ३७२.२ लाख तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झालेली प्रवासी वाहतूक तीन टक्क्यांनी वाढून ११७.१ लाख झाली.

राज्यातील वाहनसंख्या..

  • दोन कोटी ९० लाख
  • एक लाख लोकांमागे २४ हजार ४११ वाहने
  • मुंबईतील वाहनसंख्या २९ लाख
  • वैध वाहन परवाने : तीन कोटी

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2017 at 01:34 IST