मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला या वेळी धार्मिक रंग चढला असतानाही मुस्लीम उमेदवारांचे सरासरी प्रमाण मात्र कायम राहिलेले आहे. या वेळी मुंबईत सर्वपक्षीय व अपक्ष असे ३३४ मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक मुस्लीम उमेदवार देण्यामध्ये एमआयएम, समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची आघाडी राहिली आहे.
मुंबई शहरात २५.६ टक्के आणि उपनगरांत १९.१९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. २०१७ मध्ये सर्वपक्षीय व अपक्ष ३६० मुस्लीम उमेदवार होते. या वेळी मुंबईत एकूण १७०० उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत, त्यामध्ये ३३४ उमेदवार (१९ टक्के) मुस्लीम आहेत. बहुतांश मुस्लीमबहुल प्रभागात या वेळी महिला आरक्षण पडल्याने पुरुष उमेदवारांची संख्या घटली आहे. मुंबईत ४५ प्रभाग मुस्लीमबहुल असून ३० प्रभागांमध्ये मुस्लीम धर्मीय मतदार निर्णायक आहेत.
३३४ मुस्लीम उमेदवारांमध्ये ९१ अपक्ष आहेत. ४५ नोंदणीकृत पक्षांचे तर १९८ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे आहेत. भाजपने १२४ या एका प्रभागामध्ये शकील अन्सारी यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने भाजपचा या वेळी एकही मु्स्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही. सर्वाधिक मुस्लीम धर्मीयांना उमेदवारी देण्यामध्ये एमआयएम २५ (७८ टक्के), समाजवादी ५० (७१ टक्के), अजित पवार राष्ट्रवादी २३ (२४ टक्के) आणि काँग्रेस ३२ (२१ टक्के) असा चार पक्षांचा उतरता क्रम लागतो.
बसप ८, आम आदमी पक्ष ९, भाकप १, माकप १, शेकाप १, बीआरएसपी १, जनता दल १, मुस्लीम लीग २, रिपाइं ३, रिपाइं-खोरीप १ असे छोट्या पक्षांचे ४५ मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
मतविभागणीचा अंदाज
अपक्ष मुस्लीम उमेदवारांची संख्या ९१ आहे. २०१७ मध्ये ३१ मुस्लीम उमेदवार विजयी ठरले होते. त्यामध्ये काँग्रेस ११, समाजवादी ७, राष्ट्रवादी काँग्रेस ६, एमआयएम ४, शिवसेनेचे २ व अपक्ष १ अशी संख्या होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लीम मतदारांचा कल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने होता. या निवडणुकीत मुस्लीम मतांची विभागणी होण्याचा अंदाज आहे.
पक्ष—– पक्षाचे उमेदवार (मुस्लीम)——टक्के
एमआयएम——३२ (२५)————७८ टक्के
समाजवादी—-७०(५०)————-७१ टक्के
राष्ट्रवादी (अजित पवार)– ९४(२३)——२४ टक्के
काँग्रेस ———१५० (३३)——२१ टक्के
शिवसेना (शिंदे)—-९१ (१०)—— १० टक्के
शिवसेना (ठाकरे)—-१६३ (८)—- ५ टक्के
मनसे ——५३ (२)——– ४ टक्के
भाजप —-१३७ (००)———०० टक्के

