अन्य आमदार निवासाचीही दुरवस्था

घाटकोपरला ‘राईझिंग सिटी’ सार्वजनिक बांधकाम कर्मचारी वसाहतीतील सुमारे ३५० सदनिका आमदारांना देण्याचा प्रस्ताव असून त्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. ‘मनोरा’ आमदार निवास पाडून नवीन आमदार निवासाची उभारणी होणार आहे व अन्य आमदार निवासाचीही दुरवस्था असल्याने नवीन इमारतीतील सदनिका आमदारांना दिल्या जाणार आहेत.

आमदार निवासातील दुरवस्थेबाबत नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात जोरदार चर्चा झाली आणि सर्वपक्षीय आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईत आमदारांना भाडय़ाने घरे उपलब्ध करुन देण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने जाहिरात दिली होती. मात्र त्यास अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. आमदार निवासातील जागा रिकामी करण्याच्या नोटीसा आमदारांना देण्यात आल्या असून पर्यायी व्यवस्था तातडीने करावी लागणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या सदनिकांचा प्रस्ताव आता देण्यात आला असून त्यावर पुढील आठवडय़ात निर्णय होणे अपेक्षित आहे.

कर्मचारी वसाहतीतील या नवीन इमारतींमध्ये सुमारे ६५० सदनिका आहेत. एक बीएचके सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ५५० चौ फूट आहे आणि या सदनिकांची बांधणी उत्तम दर्जाची आहे. आमदारांना विधिमंडळात पोचण्यासाठी मुक्तमार्गाचा वापर करुन दक्षिण मुंबईत पोचता येणे सुलभ आहे. खासगी सदनिका भाडय़ाने घेऊन त्याचा आर्थिक भार उचलण्यापेक्षा नवीन आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आमदारांना या वसाहतीतील घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध होत नसताना या नवीन इमारतीतील सदनिका आमदारांना उपलब्ध करुन दिल्यास कर्मचाऱ्यांचा विरोध होण्याची भीती आहे.