आपला पहिलाच दसरा मेळावा गाजविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मुंबईकडे येणाऱ्या आणि परतीला जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एसटी महामंडळाला शिंदेंच्या ‘कार्यकर्ते प्रवाशी सेवे’पोटी तब्बल दहा कोटी रुपये मिळाले आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात होत आहे. मेळाव्यांना गर्दी व्हावी यासाठी बरीच चढाओढ सुरू आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मनसेच्या अंगणात भाजपचा मराठी दांडीया ; दररोज दोन विजेत्यांना आयफोन

राज्यातील एसटीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यालयात जमा झालेल्या या रक्कमेची मोजदाद महामंडळाकडून करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातून ३५० एसटी गाड्यांचे आरक्षण झाले असून नाशिकमध्ये २८०, धुळे १५०, जळगाव २५०, रायगडमधून २०० आणि ठाणे विभागातून १८५ गाड्यांचे आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी मंगळवारपासून मुंबईसाठी रवाना झाल्या असून कमी अंतराच्या एसटी बुधवारी पहाटे निघणार आहेत. या १,८०० एसटी गाड्यांच्या आरक्षणामागे सुमारे दहा कोटी रुपये रक्कम महामंडळाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या जिल्ह्यात या गाड्यांचे आरक्षण झाले आहे, तेथून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयांत रक्कम भरली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न

काय झाले?
एखाद्या राजकीय मेळाव्यासाठी पहिल्यांदाच अशाप्रकारे सर्वाधिक गाड्यांचे आरक्षण झाले असून त्यामुळे एसटीला या मोठ्या आरक्षणातून विक्रमी उत्पन्न मिळाले असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. सर्वाधिक गाड्या औरंगाबाद विभागात आरक्षित करण्यात आल्या असून तेथून ३५० गाड्या मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.

कानाकोपऱ्यातून…
शिंदे गटाकडून विविध विभागातून १,८०० गाड्यांचे आरक्षण झाल्यानंतर मंगळवारपासून या गाड्या राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.