मुंबईत ३५६४ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत

प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत देशभरातील दीड लाख रुग्ण

प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत देशभरातील दीड लाख रुग्ण

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत असतानाच हे विकार मूत्रपिंडाशी संबंधित आजारांनाही कारणीभूत ठरत आहेत. अशा आजारांमुळे मूत्रपिंड निकामी झालेले देशभरातील दीड लाख रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत.

एकटय़ा मुंबईत ३५६४ रुग्ण या रांगेत असल्याची आकडेवारी मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने (झेडटीसीसी) उघड केली आहे.

शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकणे, रक्तदाब नियंत्रित करणे, ‘ड’ जीवनसत्त्व कार्यरत करणे, इत्यादी महत्त्वाची कामे मूत्रपिंड करते. मात्र तरीही त्याची काळजी घेण्याबाबत फोरशी जागरूकता दिसत नाही. परिणामी मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. ‘मूत्रपिंडावर प्रभाव टाकण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाब ४० ते ६० टक्के कारणीभूत असतो. हे टाळण्यासाठी आहारात सकारात्मक बदल, अनावश्यक औषधे टाळणे आवश्यक आहे,’ असे मत डॉ. भरत शाह यांनी दिली.

मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या दर ३० रुग्णांपैकी एका रुग्णाला मूत्रपिंड मिळते.

त्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची यादी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘प्रत्यारोपण प्रक्रिया सोयीची’

बऱ्याचदा रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेपेक्षा (डायलिसिस) प्रत्यारोपण महाग समजले जाते. त्यामुळे रुग्ण प्रत्यारोपणाचा पर्याय निवडण्यापेक्षा रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जाणे पसंत करतात. मात्र प्रत्यारोपणाची प्रक्रिया रक्तशुद्धीकरणापेक्षा अधिक सोयीची आणि खात्रीशीर असते, असे डॉ. श्रुती तपईवाला यांनी सांगितले. रक्तशुद्धीकरणासाठी प्रतिमहिना ४० हजार रुपये खर्च येतो. काही रुग्णांना हे उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात. वर्षांतून दोनदा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. याशिवाय रुग्णासह सोबत येणाऱ्या व्यक्तीचाही वेळ आणि पैसा वाया जातो. याऐवजी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सुरुवातीला ६ ते ८ लाख रुपये खर्च येतो. मूत्रपिंड शरीराने स्वीकारावे यासाठी सुरुवातीला प्रतिमहिना १५ हजार रुपये व काही काळाने २ ते ५ हजार रुपये खर्च येतो. रक्तशुद्धीकरण करणारा रुग्ण आणि प्रत्यारोपण झालेला रुग्ण यांच्या मृत्यूची शक्यता प्रत्यारोपणापासून १०६ व्या दिवसापर्यंत सारखीच असते. त्यानंतर प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णामध्ये ती कमी कमी होत जाते व दोन्ही रुग्ण सारखेच जगतात, असे डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर आले आहे.

जागतिक मूत्रपिंड दिन

मूत्रपिंडांचे शरीरातील महत्त्व जाणवून देण्यासाठी तसेच त्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १४ मार्च रोजी ‘जागतिक मूत्रपिंड दिन’ पाळण्यात येत आहे. जगभरात ८५ कोटी जणांना मूत्रपिंडांशी संबंधित आजारांनी ग्रासले असून दरवर्षी २४ लाख रुग्णांचा अशा आजारांमुळे मृत्यू होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3564 patients waiting for kidney transplant in mumbai

ताज्या बातम्या