शिक्षकांच्या नोकरीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व माध्यमे मिळून ३७ प्रश्न चुकीचे असल्याची कबुली बुधवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘शिक्षक पात्रता परीक्षे’च्या संकेतस्थळावर दिली आहे. या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आलेल्या अंतिम उत्तरपत्रिकेमध्ये परिषदेने सर्व माध्यमे मिळून ३७ प्रश्न चुकीचे असल्याचे नमूद केले आहे.
राज्य शासनातर्फे पहिली शिक्षक पात्रता परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. त्यात अनेक प्रश्न चुकीचे होते. या संदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा देण्यात आली होती. यानुसार अनेक शिक्षकांनी चुकांची माहिती परिषदेला कळविली. यातील ३७ प्रश्न चुकीचे असून ते रद्द करण्यात आल्याचे परिषदेने  ‘http://mahatet.inया संकेत स्थळावर म्हटले आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका १ मध्ये १४ तर प्रश्नपत्रिका २ मध्ये २३ प्रश्नांचा समावेश आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका १ मध्ये मराठी आणि इंग्रजी प्रत्येकी तीन प्रश्न तर उर्दू माध्यमाच्या २० प्रश्नांसाठी देण्यात आलेल्या पर्यायांमध्ये एक पेक्षा जास्त पर्याय हे बरोबर उत्तर होते. तर प्रश्नपत्रिका दोनमध्ये मराठी माध्यमाच्या चार, इंग्रजी माध्यमाच्या पाच आणि उर्दू माध्यमाच्या २२ प्रश्नांच्या पर्यायांमध्ये एक पेक्षा जास्त पर्याय हे बरोबर उत्तर होते. असेही काही शिक्षकांनी निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात परिषदेने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
परिषदेने मान्य केलेल्या चुकांपेक्षा अधिक चुका या दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये आहेत. मात्र याबाबत परिषदेने विचार केला नसल्याचे अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याचे सचिव शेख झमीर रझाक यांनी स्पष्ट केले. तर परिक्षार्थीना सुधारित पद्धतीने गुण देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण परिषदेचे संचालक दिलीप सहस्रबुद्धे यांनी दिले आहे. तसेच या संदर्भातील सूचना उमेदवारांना प्रश्नपत्रिकेवर तसेच अर्जावरही देण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.