मुंबईत जवळपास ३७ हजार ५९ मुले रस्त्यावर राहत असून त्यापैकी २४.४ टक्के मुले बालमजूर असल्याचे आणि १५ टक्के मुले ही अंमलीपदार्थाचे सेवन करत असल्याची बाब एका सर्वेक्षणात पुढे आली आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी ४४ टक्के मुलांना मारहाण, मानहानी, लैंगिक छळासारख्या त्रासांना सामोरे जावे लागते.
‘टाटा समाजविज्ञान संस्था’ आणि ‘अ‍ॅक्शन एड इंडिया’ यांनी संयुक्तरित्या मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील पाहणी व निष्कर्षांवर ‘मेकिंग स्ट्रीट चिल्ड्रेन मॅटर – ए सेन्सस स्टडी इन मुंबई सिटी’ हा अहवाल तीन डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले.
मुंबईत ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर राहत असल्याचे तर ९०५ मुले रेल्वेस्थानकांच्या फलाटांवर राहत असल्याचे आढळून आले. अशारितीने सुमारे ३७ हजार ५९ मुले रस्त्यावर राहत आहेत.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी तब्बल ६५ टक्के मुले ही आपल्या कुटुंबासह तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात. शाळेत जाण्यायोग्य मुलांपैकी २४ टक्के मुले निरक्षर असल्याचे तर चार ते सहा या वयोगटातील ३१ टक्के मुलेच बालवाडीत जातात, असे आढळून आले आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी २४.४४ टक्के मुले ही बालमजूर आहेत. फुले विकणे, वर्तमानपत्र विकणे, हॉटेल, बांधकाम अशा व्यवसायात ती काम करतात. काही भीक मागून पैसे कमावतात आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावतात. तरीही २५ टक्के मुलांना दोन वेळचे जेवणही नीट मिळत नाही, असे निदर्शनास आले आहे.  या मुलांमध्ये अंमलीपदार्थाचे व्यसनही लक्षणीय प्रमाणात आढळले आहे. १५ टक्के मुले ही व्हाइटनर, तंबाखू, अंमलीपदार्थ अशा गोष्टींची नशा करतात, असे हा अहवाल सांगतो.
* रस्त्यावरील मुलांमध्ये ७० टक्के मुले, तर ३० टक्के मुली
* रेल्वेस्थानक, बसडेपो, धार्मिक स्थळे, बाजारपेठा अशा ठिकाणांच्या आसपास रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या अधिक
* २६/११ च्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून कारवाई होत असल्याने रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्या खूपच मर्यादित झाली आहे. अनेकांनी स्थलांतर केले.
* ५० टक्के मुलांना सशुल्क शौचालय उपलब्ध. ४०.२ टक्के मुलांकडून सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर.
* ७७.७ टक्के मुलांना आपल्यासाठी स्वयंसेवी संस्था, पोलिस, सरकारी उपक्रमांच्या योजना असतात याची कल्पना नाही.