सुशांत मोरे

मुंबई: उड्डाणपुलाजवळील किंवा त्याखालील बस थांबे टाळून थेट उड्डाणपुलावरुन एसटी नेण्याचे प्रकार मुंबईसह राज्यातील अन्य शहरातही घडत आहेत. त्यामुळे बस थांब्यावर प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप होतो. बसथांबा टाळून थेट उड्डाणपुलावरुन बस नेणाऱ्या ३९८ एसटी चालकांना हा ‘शाॅर्टकट’ भोवला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच काही चालकांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. मुंबईत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

मुंबई महानगरातील उड्डाणपुलाजवळ किंवा त्याखाली असलेल्या नियोजित बस थांब्यांवर एसटी न थांबताच काही चालक थेट उड्डाणपुलावरुनच बस घेऊन जातात. त्यामुळे बस थांब्यावर उभे असलेले प्रवासी तासनतास बसची प्रतिक्षा करतात. बसची प्रतिक्षा करत असलेले प्रवासी भ्रमणध्वनीवरुन बस आगार किंवा बस स्थानकात तसेच एसटीच्या मदत क्रमांकवर चौकशी करताच बस निघून बराच वेळ झाल्याचे किंवा नियोजित थांबा सोडून पुढे गेल्याचे समजते. त्यामुळे कुटूंबियासह आलेल्या प्रवाशांना याचा मनस्ताप होतो. शिवाय एसटीचेही उत्पन्न बुडते.

मुंबई महानगरातील दादर, मानखुर्द, वाशी हायवेजवळील उड्डाणपुल, सानपाडा, नेरुळ, कोकण भवन, खारघर, कामोठे तसेच शीवयेथील उड्डाणपुलावरुन चालक एसटी घेऊन रवाना झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे येत आहेत. हे प्रकार मुंबई, ठाण्याबरोबरच पालघर, बीड, लातूर, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातार, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर विभागातही घडले आहेत. बस थांबे सोडून उड्डाणपुलावरुन एसटी चालकांवर कारवाईही केली जाते. मे, जून आणि जुलै २०२२ मध्ये एसटी महामंडळाने १८ विभागात ही कारवाई केली. यामध्ये ३९८ प्रकरणात चालक दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करताना ६० हजार ७०० रुपये दंड वसुल केला आहे. तर ६३ चालकांची वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.