मुंबईतील परळ भागात बुधवारी (४ फेब्रुवारी) रोजी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयाच्या बाल अतिदक्षता विभागात (PICU) उपचार सुरू आहेत. हा अपघात परळ वर्कशॉपसमोरील सिग्नलवर, डॉ. बी.ए. रोडवर ही दुर्घटना घडली. या मुलाच्या वडिलांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, “माझ्या मुलाची प्रकृती आता सुधारत आहे, पण चालकाला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे.”

अपघात कसा झाला?

जखमी झालेला मुलगा अथांग तावडे (४) हा त्याचे वडील मंदार तावडे (३६) यांच्याबरोबर स्कूटरवरून घरी जात होता, तेव्हा हा अपघात घडला. मंदार तावडे त्यांची पत्नी आणि मुलाला घेऊन ज्युपिटर स्कूटरवरून लालबागच्या दिशेने जात होते. परळ पूल उतरल्यानंतर, सेंट्रल रेल्वे वर्कशॉपजवळील सिग्नलवर ते थांबले होते आणि सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत होते. सिग्नल सुटायला अवघे १०-१५ सेकंद बाकी असताना, भरधाव वेगाने आलेल्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.

रजिस्ट्रेशन क्रमांक MH-09 EM 8639 ही बस बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला चालक शामराव नाथाव नगरगोजे (३४) हा चालवत होता. दरम्यान चालकावर बस निष्काळजीपणे आणि वेगाने चालवल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातात अथांगला गंभीर दुखापत झाली असून त्याला केईएम (KEM) रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो अजूनही PICU मध्ये गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. मंदार तावडे यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार आणि फिजिओथेरपी सुरू आहे.

चालकाला अटक

दरम्यान, संबंधित शिवशाही बस चालकाला अटक करण्यात आली होती, मात्र त्याला नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिताच्या कलम २८१, १२५(अ)(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.