हँकॉक पुलाच्या पाडकामादरम्यान नियोजनाचा अभाव;  प्रवासी संघटनांचा संतप्त प्रश्न

रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा ठरणारा हँकॉक पूल जमीनदोस्त करण्यासाठी रेल्वेने घेतलेल्या १८ तासांच्या जंबो ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द होणार आहेत. चार-चार महिने आधीपासून या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अचानक घेतलेल्या या कामामुळे  गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. या गाडय़ांचे आरक्षण केलेल्या तब्बल १५ हजार प्रवाशांना आता प्रवासासाठी इतर मार्ग शोधावे लागणार आहे. एवढय़ा मोठय़ा कामाची घोषणा रेल्वे अचानक कसे करू शकते, यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप टाळता येणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.

रेल्वेच्या विस्तारीकरणात आणि खासकरून डीसी-एसी परिवर्तनानंतर रेल्वेच्या वाहतुकीत हँकॉक पुलाचा मोठा अडथळा ठरत होता. त्यामुळे रेल्वे आणि महापालिका यांनी हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. वास्तविक हा पूल पाडावा लागणार, याबाबत महापालिका आणि रेल्वे यांचे गेल्याच वर्षांत एकमत झाले होते. तसेच डिसेंबरमध्ये तो पाडण्याची तारीखही ठरली होती.

पण त्यानंतर ही तारीख पुढे ढकलून आता ९-१० जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ८-९-१० जानेवारी या तीन दिवसांत लांब पल्ल्याच्या ४२ गाडय़ा रद्द करण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे.

प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन चार महिने आधीपासून करण्याची अपेक्षा करणारी रेल्वे आपली महत्त्वाची कामे नियोजनाशिवाय कशी करते, असा प्रश्न प्रवासी संतापाने उपस्थित करत आहेत.

एवढे मोठे काम करण्याचा निर्णय रेल्वे दोन-तीन दिवसांत घेऊ शकत नाही. या कामात रेल्वेबरोबरच इतरही महत्त्वाची आस्थापने सहभागी आहेत. त्यामुळे या कामाचे नियोजन याआधीच झाले असले पाहिजे. मग प्रवाशांना याबाबत अंधारात का ठेवले, असा प्रश्न उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला.

रेल्वे नेहमीच प्रवाशांना गृहीत धरते. एक पूल पाडण्याच्या कामाचे नियोजन ज्यांना करता येत नाही, ते बुलेट ट्रेनचे नियोजन कसे करणार, असे ताशेरे ओढत देशमुख यांनी रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारावर ठपका ठेवला आहे.

प्रवाशांचे काय?

या निर्णयामुळे तब्बल १५ हजार प्रवाशांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  नियमाप्रमाणेच १२० दिवस आधी आपल्या प्रवासाचे आरक्षण केले आहे.

९ जानेवारी रोजी रद्द होणाऱ्या गाडय़ा

  • ५१०२८ अप पंढरपूर-सीएसटी पॅसेंजर
  • ५१०३४ अप साईनगर शिर्डी-सीएसटी पॅसेंजर
  • ११३०६ अप सोलापूर-सीएसटी एक्सप्रेस
  • ११४०२ अप नागपूर-सीएसटी नंदीग्राम एक्सप्रेस
  • १२११२ अप अमरावती-सीएसटी एक्सप्रेस
  • २२१०८ अप लातूर-मुंबई एक्सप्रेस
  • ११०२४ अप कोल्हापूर-मुंबई सह्य़ाद्री एक्सप्रेस
  •  ०२५९७ अप गोरखपूर-मुंबई स्पेशल एक्सप्रेस