मुंबई: शिवडी येथे ४२ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हसिना अब्दुल माजिद शेख (४२) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या गळ्यावर व इतर ठिकाणी जखमा आहेत.
महिला जखमी अवस्थेत शिवडी येथील हनुमान फिटनेस सेंटर जवळील रस्त्यावर पडली होती. याबाबतची माहिती महिलेच्या भाऊ मोहम्मद सलीम सय्यद याला मिळाल्यानंतर त्याने तातडीने तिला परळ येथील केईएम रुग्णलायात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण ती पतीपासून वेगळी राहत होती. सध्या ती एका ६० वर्षीय व्यक्तीसोबत राहत होती. त्यानेच सर्वप्रथम तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर याबाबतच माहिती महिलेच्या भावाला दिली होती. याप्रकरणी आरएके मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.