मुंबई : वाशिम येथील ४५ वर्षीय शेतकरी रमेश यांच्यावर अत्याधुनिक मिनिमली-इनवेसिव्ह व्हिपल शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला सुरुवातीच्या टप्प्यातील स्वादुपिंड (पेरिअमपुल्लरी) कॅन्सरचे निदान झाले होते. लीलावती रुग्णालयात डॉ डी. आर. कुलकर्णी, डॉ दीपक छाबरा व भूलतज्ज्ञ डॉ सुचेता एस. गायवाल यांच्यासह पथकाने स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया हे मोठं आव्हान मानले जाते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. त्याचं प्रमुख कारण म्हणजे स्वादुपिंडाबरोबर त्याच्या संपर्कात असणारे जठर, पित्ताशय आणि लहान आतड्याच्या सुरुवातीचा भाग या चारही अवयवांचा संबंध या शस्त्रक्रियेशी असतो. ही शस्त्रक्रिया सात ते आठ तास चालू शकते आणि तिला ‘व्हिपल्स शस्त्रक्रिया’ असं म्हणतात. हेही वाचा >>> पावसासोबत वाढले डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण! महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी रमेश शिरोडकर (रुग्णाच्या नावात बदल) यांना पोटदुखी, वजन कमी होणे, भूक न लागणे आणि गडद रंगाची लघवी अशा समस्या सतावत होत्या. स्थानिक डॉक्टरांकडे भेट देऊनही फरक पडला नाही. विविध तपासणी केल्यानंतर वाशिम येथील डॉक्टरांना असे आढळून आले की पित्त आणि स्वादुपिंडाच्या नलिकेच्या मुखाशी गाठ असल्यामुळे अवरोध कावीळ झाली आहे, ज्याला पेरिअमपुलरी कर्करोग देखील म्हणतात. त्यांनी ताबडतोब कावीळ कमी करण्यासाठी पित्त नलिकेत स्टेंट टाकला आणि रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील डॉ. डी. आर. कुलकर्णी यांच्याकडे पाठवण्यात आले. रुग्ण जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा कर्करोगामुळे त्याचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले होते. मूळ निदान होऊन एक महिना झाला होता. त्वरित उपचारात्मक शस्त्रक्रिया करण्यात अयशस्वी झाल्यास ट्यूमर मेटास्टॅसिस (इतर भागांमध्ये पसरतो) होऊ शकतो. तसेच रुग्णाला अनियंत्रित मधुमेह आणि पित्त नलिकेत स्टेंट होता; दोन्ही घटक अतिशय घातक आणि पित्तविषयक संसर्गास कारणीभूत ठरू शकतात, असे डॉ कुलकर्णी यांनी सांगितले.रुग्णाचे पीईटी सीटी स्कॅन, ट्यूमर मार्कर लेव्हल आणि कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेस तपासणी करण्यात आली. हेही वाचा >>> इमारतीच्या पुनर्विकासात खोडा घालणाऱ्यांना रहिवाशांना उच्च न्यायालयाचा दणका रुग्णाची लॅप्रोस्कोपिक व्हिपल शस्त्रक्रिया ही विलंब न करता नियोजनाप्रमाणे योग्य वेळी करण्यात आली. व्हिपल शस्त्रक्रिया ही आव्हानात्मक असून पोटाच्या आणि स्वादुपिंडाच्या प्रभावी शस्त्रक्रियांपैकी एक मानली जाते. या शस्त्रक्रियेदरम्यान स्वादुपिंड, पित्त नलिका आणि कर्करोगाची लागण झालेला भाग काढून टाकला जातो. यानंतर पुनर्रचना केली जाते ज्यामध्ये लहान आतडे स्वादुपिंड, पित्त नलिका पोटाशी त्याच क्रमाने जोडले जातात. काहीवेळेस प्रमुख रक्तवाहिन्या देखील काढून टाकल्या जातात आणि त्यांची पुनर्बांधणी केली जाते असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. लॅप्रोस्कोपिक व्हिपल शस्त्रक्रियेचे फायदे म्हणजे ही लहान छिद्र पाडून केली जाते, यात वेदना कमी होतात, बरे होण्याचा कालावधी तसेच रुग्णालयातील कालावधी कमी होतो तसेच रक्तस्राव देखील कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्वरीत बरा झाला व त्याला आठव्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले. व्हीपल ऑपरेशनसाठी सामान्यतः ओटीपोटात छिद्र पाडावे लागते ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर वेदना होतात आणि जखम होऊ शकते. २०३० पर्यंत स्वादुपिंडाचा कर्करोग हे कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण ठरण्याची शक्यता आहे. त्याकरिता वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.