मध्य रेल्वेवरील अपघातग्रस्तांच्या भरपाईचे ४,५०० दावे प्रलंबित

मुंबईत रेल्वे दावे न्यायालयात असलेल्या एका एकलपीठाची संख्या २०१९ मध्ये वाढवून दोन करण्यात आली,

मुंबईतील ८० टक्के  प्रकरणांचा समावेश

मुंबई : रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातानंतर संबंधित अपघातग्रस्तांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायालयात दावा केला जातो. मध्य रेल्वेच्या पाच विभागांत आठ वर्षांत भरपाईसाठी दाखल केलेल्या दाव्यांपैकी ४,५०० दावे प्रलंबित असून यात मुंबई विभागातील ८० टक्के  दावे असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबईतील रेल्वे दावा न्यायाधिकरणात २०१९ पासून एकपीठांची वाढवलेली संख्या आणि स्थापन केलेल्या लोक अदालतमार्फतही दावे निकाली काढण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहेत.

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर दरवर्षी रेल्वे मार्ग ओलांडताना, रेल्वेगाडय़ांमधून पडून आणि अन्य कारणांमुळे दोन ते तीन हजार प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो, तर तेवढय़ाच प्रमाणात प्रवासी जखमी होतात. अशा अपघातातील अपघातग्रस्त किंवा त्यांच्या वारसांकडून भरपाईसाठी दावा के ला जातो. यासाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात दाव्याचे प्रकरण चालते. मुंबईत रेल्वे दावे न्यायालयात असलेल्या एका एकलपीठाची संख्या २०१९ मध्ये वाढवून दोन करण्यात आली, तर याच वर्षांत लोक अदालतही स्थापन करण्यात आल्याने दावे निकाली काढण्याचे प्रमाण वाढले. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ या पाच विभागांत २०१७-१८ मध्ये ५२०० दाव्यांची प्रकरणे प्रलंबित होती. यामध्ये ८० टक्के  दावे मुंबईतील होते. २०१८-१९ मध्ये ते १०० ते सव्वाशेने कमी झाले. २०१९-२० मध्ये ९०० दावे निकाली काढले. मुंबईतील दावा न्यायाधिकरणात वाढवलेली एकलपीठांची संख्या व स्थापन झालेल्या लोक अदालतमुळे दावे निकाली काढण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे; परंतु २०२० मध्ये करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यावर परिणाम होऊ लागला आणि दावे निकाली लागण्याचे प्रमाण कमी झाले. या वर्षभरात ५०० दावे निकालात निघाले. आता चार हजार ५०० दाव्यांची प्रकरणे प्रलंबित असून त्यात बहुतांश मुंबईतील उपनगरीय मार्गावरील अपघात व मेल-एक्स्प्रेसमुळे होणाऱ्या अपघातांचा समावेश आहे. करोनाकाळात व्हिडीओ कॉन्फरन्स न होणे, निर्बंधांमुळे दावे करणारे वेळेत न पोहोचणे इत्यादी कारणांमुळे दावे निकाली काढण्यात समस्या आल्या; परंतु आता पुन्हा याला वेग आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कागदपत्रांची तपासणी

भरपाईसाठी सर्वाधिक दावे रेल्वेमार्ग ओलांडताना मेल, एक्स्प्रेस किंवा लोकलची धडक बसणे, लोकलमधून पडणे याच कारणांसाठी अधिक केले जातात. त्या वेळी अपघातग्रस्तांजवळ रेल्वेचे तिकीट किंवा पास आहे का, असल्यास कोणत्या स्थानापासून ते कुठपर्यंत आहे इत्यादी माहिती व कागदपत्रे तपासली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4500 accident victims claims pending with central railway zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या