लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला असून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप करभरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा कर कसा वसूल करायचा, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके वितरित करण्यास उशीर झाल्यामुळे यंदा मालमत्ता करवसुली करताना पालिकेच्या यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहेत. काटेकोर नियोजन केले असतानाही करवसुली अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेने आपला मोर्चा मोठ्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला आहे. करनिर्धारण आणि संकलन विभागाने अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ‘मुंबई मेट्रो वन’कडे चार विभागांमधील मिळून २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास सांगितले आहे. के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आणखी वाचा-‘रील्सस्टार’द्वारे निवडणूक प्रचारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत खर्चाची उमेदवारांची तयारी

करभरणा करण्यासाठी ३१ मार्चऐवजी २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली असून ४५०० कोटींचे उद्दिष्ट महापालिकेला गाठावे लागणार आहे. आतापर्यंत ३६५१ कोटींचा वसुली झाली आहे. पालिकेने जनजागृतीवर भर दिला असून दररोज दहा मोठ्या थकबाकीदारांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. करवसुलीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी बड्या थकबाकीदारांना नोटिसाही बजावण्यात येत आहेत.

कंत्राटदारांचीही थकबाकी

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असताना कंत्राटदारांनीही महापालिकेचा तब्बल ३७५ कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यावरून पालिकेने चार कंत्राटदारांना २१ दिवसांची नोटीस बजावली होती. त्यानंतरही मालमत्ता कर जमा न केल्यामुळे सात दिवसांची अंतिम नोटीस जारी करण्यात आली. मात्र या कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने ६ मेपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास प्रशासनाला मनाई केली आहे.

आणखी वाचा-मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या, किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप

चार विभागांमध्ये वसुलीचे आव्हान

विभाग मालमत्ता थकबाकी (रु.)
अंधेरी पश्चिम१८३११ कोटी ७७ लाख ८५,६६८
अंधेरी पूर्व१६ कोटी २९ लाख १,०५१
कुर्ला १९ कोटी ४ लाख ६२९
घाटकोपर १४ कोटी ६ लाख १३,२६७