मुंबई : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी टांझानियातील ४७ वर्षीय नागरिकाला अटक केली. त्याला १९ जानेवारी रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेन तस्करीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. त्याच्या शरीरातून ५५ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या असून त्यात साडेसात कोटी रुपयांचे कोकेन सापडल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी लुखुमानी फहादी मावाकी याला संशयावरून १९ जानेवारी रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. संदिग्ध व्यक्तीने सुरुवातीला विमानतळावरील शौचालयात १९ कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यानंतर सर जे.जे. रुग्णालयात २० ते २३ जानेवारीदरम्यान उर्वरित ३८ कॅप्सूल त्याच्या शरिरातून बाहेर काढण्यात आल्या. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण ५५ कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाचे द्रवपदार्थ होता, त्याचे वजन ७५१ ग्रॅम होते आणि त्याची किंमत सात कोटी ५१ लाख रुपये आहे. आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आणखी कारवाया करून सोने आणि परकीय चलन हस्तगत केले. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने २४ व २५ जानेवारीदरम्यान दोन वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण एक किलो १६० ग्रॅम सोने जप्त केले. त्याची किंमत सुमारे ८६ लाख ६८ हजार रुपये होती. तसेच एका प्रकरणात २२ लाख ४० हजार रुपयांचे परदेशी चलनही जप्त करण्यात आले.

बाकू आणि जेद्दाहहून आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयीवरून अडवले. त्यांच्याकडे २४ कॅरेट सोन्याची भुकटी सापडली असून मेणामध्ये लवपून सोन्याची तस्करी करण्यात येत होती. या कारवाईत एक किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७५ लाख ४७ हजार रुपये आहे. याशिवाय १५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगडही जप्त करण्यात आली. त्याची किंमत ११ लाख २० हजार रुपये आहे. आरोपीने बुटांमध्ये सोने लपवले होते. आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याशिवाय सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाने (एआयआयू) दुबईला जाणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला अडवले. त्याच्याकडे एक लाख सौदी रियाल (२२ लाख ४० हजार रुपये किमतीचे) जप्त करण्यात आले. आरोपीने ट्रॉली बॅगेतील कपड्यांमध्ये परदेशी चलन लपवले होते.