कलाकारांना ५ हजारांची मदत

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची गुरूवारी एक बैठक झाली.

राज्यातील ५६ हजार कलावंतांना लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : गेली दीड वर्षे करोनामुळे आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी केली. शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना मदतीचा लाभ होईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची गुरूवारी एक बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी मदत देण्यास मान्यता दिली आणि यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले.

करोनाच्या पाश्र्वाभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.  सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

लोककला पथकांनाही साहाय्य…

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. करोनामुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 5 thousand help to artists financial crisis cultural affairs minister amit deshmukh akp

ताज्या बातम्या