मुंबई : विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये गुण किंवा इतर तपशील अनावधानाने चुकीचे नमूद केल्याने त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संस्थात्मक फेरी ५ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यानंतरही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थात्मक फेरी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यातील १६७ विधि महाविद्यालयातील १३ हजार ४१८ जागांपैकी ११ हजार २१५ जागांवर प्रवेश झाले आहेत. अतिरिक्त संस्थात्मक फेरीसाठी २ हजार २०३ जागा उपलब्ध आहेत.

राज्यात पाच वर्षीय विधिच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर संस्थात्मक फेरी ५ ऑक्टोबर रोजी समाप्त झाली. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेता सीईटी कक्षाकडून संस्थात्मक फेरीला मुदतवाढ देण्यात आली. यानुसार विद्यार्थ्यांना ७ ते ८ ऑक्टोबरदरम्यान अर्जामध्ये दुरुस्ती व पसंतीक्रम भरता येणार आहे. गुणवत्ता यादी ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, ९ ते १० ऑक्टोबरदरम्यान प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.

पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या १३ हजार ४१८ जागांसाठी १८ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तीन नियमित फेऱ्या आणि संस्थात्मक फेरीनंतर ११ हजार २१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या फेरीत २ हजार ६८६, दुसऱ्या फेरीत १ हजार ४७४, तिसऱ्या फेरीत ३ हजार ४२९ अशा एकूण ७ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संस्थात्मक फेरीत ३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एकूण ११ हजार २१५ म्हणजे ८३.५८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.