मुंबई : खाजगी रुग्णालयात होणाऱ्या मोठ्या अवघड शस्त्रक्रिया आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात सहज पार पडत असून रविवारी एकाच दिवशी ५० लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त ० ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या हर्निया,रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, मान, पोटाची गाठ अशा विविध शस्त्रक्रिया विख्यात बालशल्यविशारद व केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक रूग्णांवर गरजेनुसार लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या ५० शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियांसाठी पन्नास हजार ते काही लाख रुपये लागले असते मात्र आमच्याकडे या शस्त्रक्रिया मोफत होतात असे डॉ पवार म्हणाले.

शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे एक दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच्या खाण्या पिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती. के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला मुलींच्या हर्निया, हायड्रोसिल ,चरबीची गाठ, फायमोसिस, चिकटलेली बोट, चिटकलेली जीभ,रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी सायन रुग्णालय आणि कौशल्य हॉस्पिटलचे मोठे सहकार्य लाभले. डॉ संजय ओक यांच्या समवेत डॉ पारस कोठारी , डॉ अभय गुप्ता , डॉ अदिती दळवी तसेच डॉ नम्रता कोठारी, डॉ जयंती भाटे , डॉ तुलसीदास मांगे, डॉ लीना सामंत (भूल तज्ज्ञ ) आदींचाही या शस्त्रक्रियांमध्ये मोलाचा वाटा आहे.

केईएमचे अधिष्ठाता व पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणून १३ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या विविध ग्रामीण रुग्णालयात तसेच इमेरीटस प्रोफेसर म्हणून पालिकेच्या शीव रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात. यासाठी ते फुटकी कवडीची कोणाकडून घेत नाहीत. केईएमचे अधिष्ठाता व महापालिका रुग्णालयांचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर डी.वाय.पाटील संस्थेत कुलगुरू म्हणून डॉ ओक यांनी काम पाहिले. तसेच प्रिन्स अलिखान हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

करोनाच्या काळात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अमूल्य म्हणावे लागेल. सध्या ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत असून केईएममधून निवृत्त झाल्यानंतर एकाही रविवारी सुट्टी न घेता डॉ संजय ओक हे आदिवासी भागातील तसेच गोरगरीब लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करतात.सुरुवातीला आरोग्य विभागाच्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या विविध शस्त्रक्रिया केल्या त्यानंतर अलिबाग, कुडाळ, डेरवण, शिरपूर, बारामती ,सातारा, जव्हार अशा विविध ठिकाणी जाऊन ते शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दित त्यांनी सुमारे ४९ हजार बालकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या आहेत.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी डॉ संजय ओक यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने १ डिसेंबररोजी ठाणे जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 100 हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले. रविवारच्या शस्त्रक्रियेसाठी ठाणे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातून बालकांची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आल्याचे डॉ संकेत कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ. ओक यांनी आतापर्यंत वैद्यकीय व सामाजिक विषयावर ५३ पुस्तके लिहिली असून शस्रक्रिया करण्याच्या संकल्पनेविषयी विचारले असता, ते म्हणाले की,आदिवासी दुर्गम भागातील गोरगरीब लहान मुलांच्या शस्रक्रिया करणे हे मी झाले कर्तव्य मानतो. परमेश्वराने बालशल्यचिकित्सकाचे कौशल्य मला दिले आहे ते केवळ पैसे कमाविण्यासाठी नाही. माझ्यापासून अन्य डॉक्टरांनी प्रेरणा घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावी असे मला वाटते. १३ वर्षापूर्वी केईएममधून निवृत्त झाल्यापासून मी आठवड्यातील प्रत्येक रविवार आदिवासी दुर्गम भागातील गरीब लहान मुलांवर शस्त्रक्रिया करतो.

अन्य खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना कदाचित एवढा वेळ देता येणार नाही, हे मान्य केले तरी महिन्यातून एखादा रविवार गरीब मुलांसाठी वा रुग्णांसाठी खाजगी प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांनी वेळ दिल्यास आदिवासी तसेच ग्रामीण दुर्गम भागातील लहान मुलांच्या वा मोठ्यांच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया लवकर होऊ शकतील. ज्या जटिल शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात करता येणे शक्य नसते, अशा शस्त्रक्रिया ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात केल्या जातात तर कर्करोगादी अन्य काही मोठ्या पालिकेच्या शीव रुग्णालयातही शस्त्रक्रिया करतो, असे डॉ. ओक यांनी सांगितले.

वैद्यकीय समाजसेवेचा असा असाधारण वसा जपणारे डॉ ओक हे दुर्मिळ व्यक्तिमत्व असून त्यांच्यासारख्या व्यक्तीला खरतर स्वत:हून पद्मश्रीसारखे पुरस्कार द्यायला हवा, असे मत अनेक मान्यवर डॉक्टर व्यक्त करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.