मुंबई : पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असला तरी मुंबईतील सुमारे ५० टक्के झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप झालेली नाही. दरवर्षी पावसाळय़ात मुंबईत अतिवृष्टी व जोराच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडून, तसेच वृक्षाच्या फांद्या मोडून पडल्याने अपघात होतात. त्यामुळे पालिकेतर्फे रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. खासगी सोसायटय़ा, सरकारी संस्था यांच्या आवारातील झाडांची छाटणीही शिल्लक असून आठ हजारांहून अधिक संस्थांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

मुंबईत सुमारे २९ लाख झाडे असून त्यापैकी सुमारे १५ लाख झाडे खासगी भूखंडावर आहेत. दरवर्षी पावसाळय़ात झाडे किंवा झाडांच्या फांद्या कोसळून अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने दरवर्षी रस्त्यावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणी केली जाते. त्याकरिता दरवर्षी पालिकेतर्फे कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. त्यासाठी वार्षिक ५० कोटींपर्यंत खर्च केला जातो. तर खासगी आवारातील झाडांची छाटणी नागरिकांना करवून घ्यावी लागते.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड

 पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील सर्व झाडांचे नुकतेच सर्वेक्षण केले होते. त्यानुसार पालिकेने झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यास सुरुवात केली. मृत वृक्ष मोठय़ा प्रमाणावर काढून टाकण्यात आले असून सुमारे ५० टक्के झाडांची छाटणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित झाडांच्या फांद्याची छाटणी पावसाळय़ाच्या चार महिन्यात केली जाणार आहे.

विविध सोसायटय़ा, बंगले, संस्था इत्यादींच्या मोकळय़ा जागांमध्ये असलेल्या वृक्षांची, झाडांची संबंधितांनी तपासणी करावी, त्याकरीता सोसायटीच्या वा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षकांशी संपर्क साधावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या परिसरातील झाडांची वेळोवेळी तपासणी करवून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले होते. आतापर्यंत पालिकेने आठ हजारांहून अधिक सोसायटय़ांना झाडांची छाटणी करवून घेण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक सोसायटय़ांनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे झाडांच्या छाटणीसाठी अर्ज केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मुंबईत सुमारे १५ हजार सोसायटय़ा पालिकेकडे अर्ज करतात. मात्र करोनाकाळात हे अर्ज येणे बंद झाले होते. त्यामुळे यंदा पालिकेने मोठय़ा संख्येने सोसायटय़ांना नोटिसा पाठवल्या आहेत.  महानगरपालिकेकडे आवश्यक ते प्रक्रिया शुल्क भरल्यास महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्ष छाटणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वाधिक सोसायटय़ा अंधेरी, विलेपार्लेमधील 

* आतापर्यंत पालिकेने नोटिसा पाठवलेल्या सोसायटय़ांपैकी सर्वाधिक २१०० सोसायटय़ा अंधेरी, विलेपार्ले पश्चिम परिसरात आहेत, त्याखोलाखाल मालाडमध्ये १५०० तर गोरेगावमध्ये ७३० सोसायटय़ा आहेत.

* दरम्यान, अतिशय धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाच्या फांद्याची छाटणी आधीच करण्यात आली आहे. उर्वरित झाडांमध्ये थोडीफार फांद्यांची छाटणी शिल्लक असून ती पावसाळय़ात केली जाते, अशी प्रतिक्रिया उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

* मुंबईतील एकूण झाडे …       २९ लाख ७५ हजार २८३

* खाजगी आवारांमध्ये …        १५ लाख ५१ हजार १३२

* शासकीय परिसरात ..        १० लाख ६७ हजार ६४१ 

* रस्त्यांच्या कडेला …         १ लाख ८५ हजार ९६४ 

* उद्यानांमध्ये …            १ लाख १ हजार ३६१

*  फांद्याच्या छाटणीची आवश्यकता असलेले       १ लाख २ हजार ७०

* फांद्याची छाटणी पूर्ण झाली …  ४९ हजार १६७