उमाकांत देशपांडे लोकसत्ता

मुंबई : मुलुंड येथे पाच हजार खाटांचे भव्य साथ रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव गेले काही महिने जागेच्या वादातून रखडला आहे. त्यामुळे आता अन्य जागांसह सेव्हन हिल्स रुग्णालय विकत घेण्याच्या पर्यायावरही राज्य सरकारने विचार सुरू केला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलुंडला सुमारे पाच हजार खाटांचे भव्य करोना साथ रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. सुमारे २१०० कोटी रुपयांची जागा ‘श्वास बिल्डर्स’कडून विकत घेण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी राज्य सरकारला पाठविला होता. मात्र बिल्डरचे मुख्यमंत्र्यांशी संबंध असून हा कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. कब्जे हक्काने दिलेली शासकीय जमीन मालकी हक्काने रूपांतरित करून (क्लास टू टू क्लास वन) ती रुग्णालयासाठी विकण्याचा डाव असल्याचे आरोप झाले.

ही चौकशी प्रलंबित असून मुलुंडच्या जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर रुग्णालयाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर म्हणाले, हे केवळ घोषणाबाज सरकार असून मर्जीतील बिल्डरला लाभ देण्याचा गैरव्यवहार भाजपने उघड केला, त्यामुळे रुग्णालय उभारणीबाबत पावले टाकली नाहीत.

पर्यायांवर विचारविनिमय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रुग्णालय कोठे उभारायचे हे अद्याप निश्चित झाले नसून वेगवेगळ्या पर्यायांवर विचारविनिमय सुरू आहे. मुलुंड किंवा अन्य जागेचाही विचार होऊ शकतो किंवा सेव्हन हिल्स रुग्णालय उपलब्ध असल्याने ते शासनाला विकत घेता येईल का, याबाबतही विचार सुरू आहे. तसे झाल्यास १८०० ते दोन हजार खाटांचे साथ रोग रुग्णालय करता येऊ शकेल. मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.