विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज वेळेत न भरण्याच्या महाविद्यालयांच्या हलगर्जीपणाचे परिणाम सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत. कारण, पात्रता अर्जानंतरही नोंदणी न झाल्याने या विद्यार्थ्यांचे निकाल मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे रोखून ठेवले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सुमारे ३०० महाविद्यालयांमधील १२ हजार विद्यार्थ्यांचे पात्रता (एलिजिबिलीटी) अर्जच विद्यापीठाकडे जमा झाले नसल्याची बाब परीक्षेच्या तोंडावर उघड झाली होती. त्यामुळे, या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठाकडे पाठपुरावा केल्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले. अजूनही पाच हजार विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज विद्यापीठाकडे जमा झालेले नाहीत. या गोंधळाला महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप मनविसेच सुधाकर तांबोळी यांनी केला. विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्या या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तृतीय वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या पाचव्या सत्राचे परीक्षा अर्ज भरताना महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र काही महाविद्यालयांनी पात्रता प्रमाणपत्र नसल्याने परीक्षा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात भरले होते. अशा विद्यार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर केले नव्हते. अशा ११ हजार विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने रोखून धरला होता. दरम्यानच्या काळात काही महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, अजूनही पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे जमा झालेले नाहीत.
नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत

प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, विधी (पाच वर्षांचा) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश फेऱ्यांनंतरही ज्या महाविद्यालयांध्ये जागा रिक्त राहतात त्यांच्याकरिता ही मुदत वाढविण्यात आली आहे. २७ जूनपर्यंत दुपारी १२पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल, असे विद्यापीठाचे रजिस्ट्रार एम. ए. खान यांनी कळविले आहे.