मुंबई : मुंबईत महिला अत्याचारांचे अकरा महिन्यांमध्ये ५१५४ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी ४०६३ गुन्हे उघड झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री सुरू असल्याचे आढळून येईल, त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार येईल आणि ती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
महिला अत्याचारांसंदर्भात भाई गिरकर, नागो गाणार यांच्यासह काही सदस्यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबईत महिलांच्या विनयभंगाचे १५४४ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १२५२ गुन्हे उघड झाले आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे ४८४ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ४७३ गुन्ह्यांची उकल झाली आहे, तर महिलांवर बलात्काराचे ३४४ गुन्हे दाखल झाले असून २६४ उघड झाले असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. अमली पदार्थाच्या विक्रीबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, शाळा व महाविद्यालय परिसरांत गस्त वाढवून अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत पोलीस उपायुक्तांसमवेत बैठकही घेण्यात येईल. उल्हासनगर येथे २९ नोव्हेंबर २०२१ रोजी एका नायजेरियन व्यक्तीकडून अमली पदार्थासह एक लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्याला अटक केली आहे व आरोपपत्रही दाखल करण्यात आल्याचे देसाई यांनी नमूद केले.