आयव्हीएफ पद्धतीने गर्भधारणा झाल्यानंतर निर्माण झालेल्या अडचणीमुळे कमी दिवसांच्या अवधीत जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती गंभीर बनली. अपुरे दिवस, त्याचबरोबर जन्मतःच कमी वजन, श्वसनास त्रास, पोटातील जंतू संसर्ग, रक्तामधील जंतुसंसर्ग, आकडी अशा अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त बाळावर अतिदक्षता विभागात तब्बल ५४ दिवस उपचार करून त्याचे वाचविण्यात कामा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
हेही वाचा >>>मुंबई : डाळी, कडधान्ये शंभरीपार; होळीपर्यंत जैसे थे परिस्थिती
मुंबई सेंट्रल येथील सिद्धार्थ नगरमध्ये राहणाऱ्या निधी यादव (४५) (नाव बदलले आहे) या महिलेला लग्नानंतर गर्भधारणा होत नसल्याने त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. अखेर १० वर्षानंतर यादव दाम्पत्याने आयव्हीएफ पद्धतीने गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला. यातही तज्ञांकडून ५० टक्केच शक्यता वर्तविल्यानंतरही हे जोडपे आयव्हीएफवर ठाम होते. गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात निधीला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने तिला कामा रुग्णालयाच्या हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये डॉ. तुषार पालवे यांच्या युनिटमध्ये तीन दिवसांच्या अंतराने १३ दिवस दोन वेळा दाखल केले. रक्तदाब सुरळीत करताना तिची आठव्या महिन्यातील केलेल्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयातील बाळाची वाढ मंदावल्याचे तसेच मातेकडून गर्भाला रक्ताचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बाळाच्या जीवास निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी तत्काळ सिजेरियन करण्याचा निर्णय डॉ. तुषार पालवे यांनी घेतला.
विधीने ६ डिसेंबर २०२२ रोजी १.४५६ किलोग्रम वजनाच्या बाळाला जन्म दिला. बाळ अपुऱ्या दिवसाचे आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यास तत्काळ नवजात अर्भक अतिदक्षता विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. श्रुती ढाले यांच्या युनिटमध्ये दाखल करण्यात आले. बाळाला श्वसनास त्रास होत असल्याने नळीवाटे प्राणवायू देण्यास सुरुवात केली. परंतु दुसऱ्या दिवशी श्वसनाचा त्रास वाढल्याने बालकाला जीवन रक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले. बाळाच्या फुफुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठीची औषधे आणि जंतुसंसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैवके सुरू करण्यात आली. बाळ ठेवलेली जागा, वापरण्यात येणारी उपकरणे आणि कपड्यांचे नियमित व काटेकोरपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. बाळाच्या श्वसनक्रियेत सुधारणा होऊ लागल्यानंतर त्याला देण्यात येणारा कृत्रिम श्वास कमी करण्यात आला. सहा दिवसांनंतर बाळाला लावलेली जीवन रक्षक यंत्रणा काढून पुन्हा नळीवाटे प्राणवायू देण्यास सुरुवात झाली. बाळाला ५४ दिवसांनंतर २ फेब्रुवारी रोजी घरी सोडण्यात आले. विभाग प्रमुख डॉक्टर श्रुती ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता विभागाच्या सिस्टर इन्चार्ज ज्योती डाके, प्रवीण कोष्टी, सहाय्यक अधिसेविका निरुपमा डोंगरे यांनी विशेष मेहनत घेतली, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
हेही वाचा >>>Video: “कशाला स्वत:ची अब्रू…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
१३ दिवस बाळ सलाईनवर
अतिदक्षता विभागात दाखल केल्यापासून १३ दिवसांपर्यंत बाळ सलाईनवर होते. १४ दिवसांपासून त्याला तोंडातील नळीवाटे दूध देण्यास सुरुवात झाली. परंतु दूध पचत नसल्याने ते दोन दिवसांनी बंद करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आठ दिवसांनंतर त्याला दूध सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागातील ५४ दिवसांमध्ये अपुरे दिवस, कमी वजन, श्वसनास त्रास, पोटातील जंतू संसर्ग, रक्तामधील जंतुसंसर्ग, आकडी येणे असा त्रास बाळाला होत होता.