‘एमटीएनएल’मधील कंत्राटी भरतीसाठी ५५ कोटी

कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी व्यवस्थापनाने ५५ कोटींची तरतूद केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कर्मचारी मात्र वेतनापासून वंचित

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : स्वेच्छानिवृत्तीमुळे अक्षरश: रिकाम्या झालेल्या ‘महानगर टेलिफोन निगम’च्या मुंबई व दिल्लीतील कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी व्यवस्थापनाने ५५ कोटींची तरतूद केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकीकडे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतन उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या व्यवस्थापनाने कंत्राटी भरतीसाठी तातडीने आर्थिक तरतूद केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने ३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून दिल्लीतील एका कंपनीला सहा महिन्यांसाठी वाहनचालक, लाईनमन, सहायक लाईनमन आणि सफाई कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटापोटी सहा महिन्यांसाठी ५५ कोटी खर्च होणार आहेत. लाईनमनसाठी ४०,२४१ रुपये व सहायक लाईनमनसाठी  ३७,२०५ रुपये तर सफाई कर्मचारी/सुरक्षारक्षक यासाठी ३६,५८३ रुपये वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. या कंपनीचे मुबंईत एकही कार्यालय नाही, मुंबईची काहीही माहिती नाही, तसेच या कंपनीची कोठेही नोंदणी नाही. त्यामुळे मुंबईतील एमटीएनएलच्या केबल नेटची माहिती असणे अशक्य आहे. तरीही दिल्लीतील या कंपनीला कंत्राट दिले गेले आहे, याकडे युनायटेड फ्रंट या कर्मचारी संघटनांच्या महासंघाने लक्ष वेधले आहे.

‘एमटीएनएल’चे मुंबईतील अधिकारी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लाईनमन आणि इतर कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून कर्मचाऱ्यांना या कंपनीसाठी काम करण्याचे तोंडी आवाहन करीत आहेत. एखाद्याने लिखित स्वरूपात आदेश मागितले तर त्याला ते ‘आपण आहोत ना’, असे सांगून आश्वस्त करीत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना आवाहन करताना अंदाजे १६,००० ते १९,५०० रुपये मानधन मिळेल, असे सांगत आहेत, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे.

‘हीत’ कोणाचे? : स्वेच्छानिवृत्तीनंतर दूरध्वनी सेवेचा बोजवारा उडू नये म्हणून व्यवस्थापनाने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. पण अशी कोणतीही खबरदारी न घेता स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्यात आली. संपूर्ण मुंबईत दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली. व्यवस्थापनाने कंत्राटी भरती वेळीच केली असती तर कंत्राटी कामगारांना एमटीएनएल कर्मचाऱ्यांसोबत काम करून अनुभव घेता आला असता, याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे. ‘एमटीएनएल’मधील माजी कर्मचाऱ्यांना १६ ते १९ हजार रुपये मानधन दिल्यानंतर कंत्राटदार कंपनीच्या घशात हजारो रुपये जाणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतर कंत्राटी पद्धतीने तरुण कर्मचाऱ्यांऐवजी माजी कर्मचाऱ्यांची भरती करून काय साध्य होणार आहे, असा सवालही महासंघाने केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 55 crore for contract employee recruitment in mtnl zws

ताज्या बातम्या