मुंबईः वडाळा येथील ५५ वर्षीय रहिवासी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गुजरातमध्ये गेले असताना सायबर भामट्यांनी त्यांच्या डीमॅट खात्यातून सर्व शेअर्स हस्तांतरीत केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपींनी तक्रारदार व्यक्तीच्या डीमॅट खात्याची लिंक असलेला मोबाईल क्रमांक बदलून सर्व शेअर्स हस्तांतरीत केले. त्यांची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

५५ वर्षीय तक्रारदार वडाळा येथील रहिवासी आहेत. ते वीज कंपनीत कार्यालय पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार एप्रिल महिन्यात नर्मदा नदी परिक्रमा करण्यासाठी गुजरातला गेले होते. तेथील गरुडेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईत परतले. त्यावेळी त्यांनी नोकरीवर रुजू झाल्यानंतर डीमॅट खाते तपासले. त्यावेळी त्यांच्या डीमॅट खात्यात एकही शेअर शिल्लक नसल्याचे दिसून आले. त्यांना प्रथम तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे वाटले. पण वारंवार तपासले असता मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये ४० पैकी एकही शेअर दाखवत नव्हता. अखेर त्यांनी डीमॅट खाते असलेल्या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना नेटवर्कमुळे तसे होत असल्याचे सांगितले. अखेर तक्रारदार यांनी कंपनीच्या कार्यालयालाही भेट दिली. त्यावेळीही त्यांना तेच सांगण्यात आले.

मोबाइल आणि ईमेल बदलला

त्यांनी मोबाइल तपासला असता तक्रारदार यांचे डीमॅट खाते व सीडीएसएलला लिंक असलेला मोबाइल क्रमांक बदलण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला होता. पण तक्रारदार नर्मदा नदी परिक्रमा करत असल्यामुळे त्यांनी त्या काळात मोबाइलवरील संदेश पाहिले नाही. तसेच तक्रारदाराच्या ईमेल आयडीशी साधर्म्य असलेल्या ईमेल तयार करून डीमॅट खाते त्याला लिंक करण्यात आल्याचेही तक्रारदाराच्या लक्षात आले. २५ एप्रिलला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने डीमॅट खाते सुविधा पुरवणाऱ्या कंपनीत जाऊन तपासणी केली असता त्यांच्या नावावरील ४० कंपन्यांचे ८६६९ शेअर्स हस्तांतरीत करण्यात आल्याचे समजले. त्यांची किंमत १९ लाख ९८ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

१२ दिवसांत सर्व शेअर्स हस्तांतरीत

तक्रारदार नर्मदा नदी परिक्रमा करत असताना ७ ते १८ एप्रिल या काळात ८६६९ शेअर्स दुसऱ्या कंपनीच्या डीमॅट खात्यात हस्तांतरीत करण्यात आले. तक्रारदाराच्या नावाने संबंधीत डीमॅट खाते उघडण्यात आले असून त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. त्यातील काही शेअर्स तक्रारदारांच्या वडिलांनी खरेदी केले होते. त्यांचे निधन झाल्यानंतर ते तक्रारदार यांच्या खात्यात हस्तांतरीत झाले होते.