टाळेबंदी शिथिल होताच महिलांवरील हिंसाचारात वाढ

मुंबई : टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे ५५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनयभंगाचे सुमारे ११०० गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

साकीनाका भागात महिलेवर अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबईसह संपूर्ण राज्य सुन्न झाले. अमानुषपणे महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. टाळेबंदी शिथिल होऊन वर्दळ वाढू लागताच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यादरम्यान मुंबईत बलात्काराच्या ३७७ घटना घडल्या होत्या. त्यातील २९९ घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली.  यंदा गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मुंबईत बलात्काराचे ५५० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील ४४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचे गुन्हेही वाढले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत विनयभंगाचे ९८५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदा ११०० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे.  २०२० मध्ये पूर्ण वर्षात मुंबईत बलात्काराच्या ७६७ घटना घडल्या, तर विनयभंगाचे १९४५ गुन्हे दाखल झाले होते.

हुंडाबळीच्याही घटना

हुंडाबळीचे प्रकार  कमी झाले असले तरी पूर्णत: बंद झालेले नाहीत. मुंबईत हुंडाबळीच्या ८ घटना घडल्या असून हुंड्यासाठी केलेल्या छळाप्रकरणी ३९७ महिलांनी तक्रार दाखल केली आहे.

मुलींचे प्रमाण अधिक

अल्पवयीन मुली अत्याचारांना अधिक बळी पडत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मुंबईत या वर्षी सात महिन्यांमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये ३२३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले, तर २२७ प्रौढ महिलांवर बलात्कार झाले. पोक्सो कायद्यांतर्गत  विनयभंगाचे ७ महिन्यांत २४३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.