मुंबईतील करोना रुग्णवाढीचा दर कमी झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३७४ दिवसांवर गेला आहे. सोमवारी ५५७ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून ८१७८ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर ९३ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात येत असून रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्कय़ापर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी ३७४ दिवसांपर्यंत गेला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणेविरहित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत.

नवीन ५७८ रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २ लाख ९१ हजारांपुढे गेला आहे. सोमवारी  एका दिवसात ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत  २ लाख ७१ हजारांहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्क्यांहून कमी अहवाल बाधित येत आहेत.

आतापर्यंत २३ लाख ११ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १३ टक्कय़ांच्याही खाली गेले आहे. सोमवारी १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.  त्यातील ८ पुरुष होते तर ४ महिला होत्या.  हे सर्व जण ४० वर्षांवरील होते. गेल्या नऊ महिन्यांत करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११,०८८ झाली आहे.

राज्यात  २,४९८ जणांना संसर्ग : राज्यात गेल्या २४ तासांत २,४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ५७,१५९ रुग्ण उपचाराधीन आहेत. याच काळात ४५०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात पुणे शहर १५४, पिंपरी-चिंचवड ५३, पुणे जिल्हा १२०, नागपूर शहर २९० नवे रुग्ण आढळले.

ठाणे : जिल्ह्य़ात सोमवारी २८३ नवे  रुग्ण आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. २८३ करोनाबाधितांपैकी ठाण्यातील १०६, नवी मुंबईतील ४९, कल्याण डोंबिवलीमधील ४७, मीरा-भाईंदर ३५, बदलापूर १६, ठाणे ग्रामीण क्षेत्रातील १६, अंबरनाथ आठ, उल्हासनगर चार आणि भिवंडीतील दोघांचा सामावेश आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाबाधितांचा आकडा २ लाख ४२ हजार ९७ इतका झाला आहे. तर सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला. यात कल्याण, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा सामावेश आहे. मृतांची संख्या ५ हजार ९२९ इतकी झाली आहे.