scorecardresearch

राज्यातील ६०८ एसटी स्थानकांचा लवकरच कायापालट

परिवहन खात्याची ३५० कोटींची योजना

(संग्रहित छायाचित्र)
संदीप आचार्य

राज्यातील एसटी स्थानकांची दूरवस्था, प्रवाशांचे होणारे हाल, कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करून सर्वच्या सर्व ६०८ एसटी स्थानके ही प्रवाशांसाठी सुसह्य़ व मैत्रिपूर्ण करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेत एसटी स्थानकांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात येणार असून, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, प्रशस्त प्रतिक्षालये, प्रवाशांसाठी चांगले आसनकक्ष, उपाहारगृहे आणि कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहे बांधण्यात येणार आहेत. सुमारे ३५० कोटी रुपयांची ही योजना असून या स्थानकांमध्ये आरोग्यसेवाही उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

एसटीच्या जवळपास १८,५०० गाडय़ांच्या माध्यमातून दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी राज्यातील वेगवेगळ्या भागात प्रवास करत असतात. तथापि खाजगी वाहतुकीमुळे तसेच डिझेल वाढ आणि सवलतीच्या दरातील प्रवाशांच्या संख्येमुळे एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर दर्जेदार व परिणामकारक सेवा मिळाल्यास एसटीचे कमी होणारे प्रवासी वाढतील हे लक्षात घेऊन एसटीसेवा परिणामकारक व प्रवासी केंद्रित करण्याबरोबरच एसटी स्थानकांचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

दररोज तीन कोटींचा तोटा..

आजघडीला राज्य परिवहन महामंडळाचा तोटा सुमारे साडेचार हजार कोटी रुपये असून रोजचा तोटा सुमारे तीन कोटीहून अधिक आहे. एसटीला तोटय़ामधून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी अभ्यास करून ठोस उपाययोजना करण्यात येतील. त्याचबरोबर राज्यातील ६०८ एसटी स्थानकांचा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर असल्याचे परिवहनमंत्र्यांनी सांगितले. यात प्राधान्याने उत्तम स्वच्छतागृहे असतील, प्रवाशांना बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था, उपाहारगृह, तसेच कर्मचाऱ्यांसाठी चांगले आरामगृह एसटी स्थानकांमध्ये निर्माण केले जाईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख एसटी स्थानकांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

७६ स्थानकांचे काम सुरू

एसटी स्थानकांचे आधुनिकीकरण करताना प्रवाशांच्या वर्दळीचा तसेच बसेसच्या येण्याजाण्याच्या मार्गाचा आढावा घेऊन अधिक चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी स्थानकांची प्रवेशद्वारे आकर्षक केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ ४४ एसटी स्थानकांचाच चेहरा मोहरा बदलला असून अजून ७६ स्थानकांचे काम सुरु आहे. तथापि या कुर्मगतीमध्ये बदल करून वेगाने राज्यातील एसटी स्थानकांचा चेहरामोहरा बदलून प्रवासी स्नेही करण्यात येणार असून यातून एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्यास काही प्रमाणात मदत होईल, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 608 st stations in the state will soon be transformed abn

ताज्या बातम्या