सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रकरणांवरून झालेल्या गोंधळामुळे एकूण १५६ तासांच्या कामकाजापैकी फक्त ९५ तासच काम झाले आहे. उर्वरित ६१ तासांचे कामकाज वाया गेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यावरून या आठवडय़ात विधानसभेचे कामकाजच होऊ शकले नाही. ११ मार्चपासून सुरू झालेल्या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाज २० दिवस झाले असले तरी त्यापैकी १० दिवसांचे कामकाज पूर्ण किंवा अशंत: गोंधळांमुळे वाया गेले. अधिवेशनात कामकाज होत नसल्याने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
पहिल्या आठवडय़ात २४ तास कामकाज झाले तर साडेनऊ तासांचे कामकाज वाया गेले. दुसऱ्या आठवडय़ात १८ तास कामकाज झाले तर १६ तास वाया गेले. आतापर्यंत २० दिवसांच्या कामकाजात फक्त २६ मार्चला संपूर्ण दिवसभर कामकाज झाले आहे. या आठवडय़ातील तीन दिवसांत फक्त दोन तासांचे कामकाज तेही गोंधळातच पार पडले.  
या अधिवेशनात पाच विविध मुद्दय़ांवरून कामकाज बंद पडले होते. ‘इंडियाबुल्स’वरून राज्यपालांचे निर्देश बंधनकारक नाहीत अशी उच्च न्यायालयात मांडण्यात आलेली भूमिका, पोलिसाला आमदारांकडून झालेली मारहाण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गोंधळ, निधीवाटपात विरोधी आमदारांच्या मतदारसंघांना डावलणे, अजित पवार यांचे वक्तव्य अशा पाच वेगवेगळ्या कारणांमुळे विधानसभेच्या कामकाजात अडथळा आला आहे.