हेल्मेटसक्तीच्या पाश्र्वभूमीवर वास्तव उघड
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यभरात दुचाकीस्वारांनाच नाही, तर त्यांच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्तीचे केल्यानंतर त्याविरोधात वातावरण पेटले आहे. मात्र गेल्या वर्षभरात एकटय़ा मुंबईत झालेल्या रस्ते अपघातांतील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दुचाकींच्या अपघातांत गेल्या वर्षी १८९ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे यापैकी ६२ जण दुचाकीस्वाराच्या मागे बसून प्रवास करणारे होते. राज्याचा विचार करता हा आकडा निश्चितच वाढेल.
सध्या परिवहन विभागाने केलेल्या हेल्मेटसक्तीला विविध थरांमधून विरोध होत आहे. विशेष म्हणजे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच गाडी चालवणे, हा नियम असतानाही परिवहन विभागाला अशा प्रकारे सक्ती करावी लागत आहे. त्यातच परिवहनमंत्री रावते यांनी दिलेल्या नव्या आदेशांनुसार ही हेल्मेटसक्ती फक्त दुचाकीस्वारापुरतीच मर्यादित नसून त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशांनाही लागू आहे. त्यामुळे ही विरोधाची धार अधिकच तीव्र झाली आहे.
मात्र, हा निर्णय एका वर्षांपूर्वी लागू केला असता, तर एकटय़ा मुंबईतील १८९ जणांचे प्राण वाचण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दुचाकींच्या अपघातांत या १८९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६२ जण मागे बसून प्रवास करणारे होते. त्याशिवाय ९९५ दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांपैकी ५७८ जणांच्या जखमांचे स्वरूप अत्यंत गंभीर होते. तर उर्वरित ४१७ जणांच्या जखमा किरकोळ होत्या. दुचाकीवर मागे बसलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या ४०३ एवढी असून त्यापैकी २४१ जण गंभीर जखमी होते. उर्वरित १६२ प्रवाशांचे किरकोळ जखमांवर निभावले. ही केवळ मुंबईतील आकडेवारी असून पूर्ण राज्याचा विचार केल्यास, या संख्येत नक्कीच भरमसाट वाढ होईल. दुचाकीवरील प्रवाशांनी हेल्मेट घातले, तर अपघातानंतर त्यांचा बचाव होण्याची शक्यता जास्त असते. हेल्मेटसक्तीमुळे या मृतांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा आरटीओ अधिकारी व्यक्त करत आहेत.