हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाने दहा महिन्यांत ६२ पोलिसांचा मृत्यू
शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी बारा तास ऑन डय़ुटी राहणाऱ्या  पोलिसांना स्वत:च्या शरीराची सुरक्षितता जपणे अवघड झाले आहे. या वर्षी हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब या आजारांमुळे आतापर्यंत ६२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. उच्च अधिकारी व्यायाम, जीवनशैली याबाबत दक्ष असले तरी बढतीच्या मार्गाने पुढे जात असलेल्या शिपाई, हवालदार, उपनिरीक्षक या पदावरील पोलिसांना जीवनशैली सुधारणे कठीण जात असल्याचा हा अपरिहार्य परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पोलिसांचे कामाचे तास आणि तणावाची जीवनशैली यामुळे त्यांना चाळिशीतच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आयुष्यभराचे आजार होतात, हे आता सर्वश्रुत आहे. पोलिसांच्या आरोग्य तपासण्या, त्यांच्या व्यायामासाठी जिम, जीवनशैली सुधारण्यासाठी विविध योजना राबवूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट वर्षांगणिक आजारांमुळे कार्यरत असलेल्या पोलिसांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षभरात १४९ पोलिसांचा मृत्यू झाला. यात अपघाती मृत्यूंपासून आत्महत्यांपर्यंतचा समावेश आहे. त्यातील ३८ पोलीस हे केवळ हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. अर्थात त्यातील अनेकांना मधुमेह व रक्तदाबही होता. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांच्यासह फुप्फुसांचे आजार, दमा, मूत्रपिंड विकार अशा व्यवसायाशी संबंधित आजाराने मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या ६५ होती. या वर्षी दोन महिने बाकी असतानाच ही संख्या ६२ वर पोहोचली आहे. अर्थात हा केवळ गेल्या दोन वर्षांचाही प्रश्न नाही. आधीच्या दशकभरातील आकडेवारीनुसार तब्बल ४४९ पोलिसांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
हृदयविकार हा आजार एकटा येत नाही. बरेचदा पोलिसांच्या कामाच्या वेळा, सवयी, व्यसन, आहार, ताण यामुळे मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. हा त्रास सुरू झाल्यावरही त्याकडे लक्ष देणे व हे आजार आटोक्यात ठेवण्यासाठी जीवनशैली बदलणे पोलिसांना शक्य नसते. रक्तदाब व मधुमेह काबूत न ठेवल्याने रक्ताच्या गुठळ्या होतात व हृदयविकाराचा झटका येतो. मृत्यू हृदयविकाराने झाला तरी त्यामागे बहुतेक वेळा मधुमेह व उच्च रक्तदाब हे कारण असते, असे पोलीस दलाचे गेले दहा वर्षे मानद सल्लागार असलेले हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे म्हणाले.
पोलीस दलातील उच्चाधिकाऱ्यांना तणावाचा सामना करण्यासाठी, आरोग्यशैली सुधारण्याबाबत ज्ञान असते. मात्र बारा तास उन्हात राहणाऱ्या, जेवणाची-पाण्याची सोय नसलेल्या वातावरणात तणावात राहणाऱ्या पोलिसांना तंबाखू, दारू ही व्यसने सोडणे कठीण जाते. बारा-चौदा तासांनी घरी गेलेल्या पोलिसांकडून व्यायामाची व शरीर तंदुरुस्त ठेवण्याचीही अपेक्षा करता येत नाही. पोलिसांना कुटुंब आरोग्य योजनेमार्फत २७ आजारांवर तातडीने उपाय देण्याची योजना उत्तम असली तरी मुळात हे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक पातळीवर प्रभावी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पोलिसांशी निगडित आणखी एका डॉक्टरांनी सांगितले.
२०१४ मध्ये १४९ पोलिसांचा मृत्यू. त्यातील ६५ मृत्यू हे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, मूत्रपिंड विकार आणि फुप्फुसांच्या आजाराने झाले. या वर्षी आतापर्यंत अशा प्रकारे ६२ मृत्यू झाले.