महिला आंघोळ करत असताना बाथरुममध्ये घुसखोरी केल्याप्रकरणी ६२ वर्षीय कामगाराला अटक करण्यात आली आहे. दत्ताराम सुर्वे असं या कामगाराचं नाव आहे. दत्ताराम सुर्वे याने खिडकीच्या सहाय्याने फ्लॅटमध्ये घुसखोरी करत बाथरुममध्ये महिला आंघोळ करत असताना प्रवेश केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महिला राहत असलेल्या फ्लॅटबाहेर खिडकीच्या बाहेर रिपेअरिंगचं काम सुरु असल्याने तिथे बांबू बांधण्यात आले होते. महिलेने तक्रारीत सांगितलं आहे की, ‘शुक्रवारी ही घटना घडली तेव्ही मी बाथरुममध्ये होते. आपण दरवाजा लॉक केलेला नव्हता’.

जेव्हा महिलेने दत्ताराम सुर्वे याला पाहिलं तेव्हा त्याने तिथून पळ काढला. महिलेने बाहेर धाव घेत आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. ‘कोणीही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश करताना पाहिलेलं नव्हतं. घऱाची पाहणी केली असता खिडकीतून प्रवेश केला असल्याचं लक्षात आलं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेने बिल्डिंगच्या सेक्रेटरीकडे यासंबंधी तक्रार केली असता रिपेअरिंगचं काम करणाऱ्या कंत्राटदार आणि कामगारांना बोलावण्यात आलं. महिलेने दत्ताराम सुर्वे याची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.