मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

आज दिवसभरात २२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २१२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई हा करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. कारण करोनाचे महाराष्ट्रात जे रुग्ण आहेत त्यापैकी निम्म्याहून जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत १० हजार रुग्णांची संख्याही पार करु शकते. अशा सगळ्या वातावरणात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. १७ मे पर्यंत म्हणजेच लॉकडाउन असेपर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

मुंबईत खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. धारावीतही करोनाचे रुग्ण कमी व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दररोज मुंबईची रुग्णसंख्या वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे करोनाचे ५ हजार रुग्ण झाले आहेत. तर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत रुग्णसंख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे.