खासगी केंद्रांवरील लसीकरणाला ओहोटी ; दिवसभरात केवळ दोन हजार नागरिकांना लसमात्रा

मुंबईत आतापर्यंत एक कोटी ४२ लाखांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे.

सात टक्के लसीकरण खासगी केंद्रांवर

मुंबई : बहुतांशी नागरिकांची लशीची पहिली मात्रा घेऊन झाली असून शासकीय केंद्रांवर लसमात्रांची उपलब्धता वाढल्यामुळे  खासगी लसीकरण केंद्रांवरील नागरिकांचा ओघ कमी होऊ लागला आहे. बुधवारी दिवसभरात केवळ २,२२१ नागरिकांनी खासगी लसीकरण केद्रावर लस घेतली. दर दिवशी मुंबईत होणाऱ्या लसीकरणापैकी जेमतेम सात टक्के लसीकरण खासगी केंद्रांवर होत आहे.

मुंबईतील ९७ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, तर ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. त्यामुळे आधीच लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच पालिकेच्या आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील गर्दीही ओसरू लागली आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत लस उपलब्ध असल्यामुळे खासगी लसीकरण केंद्रावरील गर्दी आणखी आटली आहे. बुधवारी दिवसभरात ३० हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले. त्यात केवळ २,२२१ नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्रावर लस घेतली.

मुंबईत आतापर्यंत एक कोटी ४२ लाखांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ५३ लाखांहून अधिक जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे, तर ८९ लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.   

खासगी लसीकरण केंद्रांवर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दिवसाला ७० हजार मात्रा दिल्या जात होत्या. त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. मुंबईत १४५ खासगी लसीकरण केंद्रे असून दिवसाला ३७ हजारांहून अधिकांचे लसीकरण करण्याची क्षमता या केंद्रांची आहे. मात्र सध्या केवळ दोन हजारांच्या आसपास नागरिकांचे लसीकरण होत आहे.

रुग्णालयांचा प्रश्न

खासगी केंद्रावरील गर्दी कमी झालेली असली तरी ही केंद्रे बंद करावी की करू नये हा आता त्या त्या रुग्णालयांचा प्रश्न आहे. पालिकेने या केंद्रांना परवानगी दिली आहे. लशीची उपलब्धता असली तरी एखाद्याला खासगी केंद्रावरच लस घ्यायची असल्यास त्याला तो पर्याय उपलब्ध असला पाहिजे, असे मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले.

४६३ मुंबईतील एकूण केंद्रे

१४५ खासगी केंद्रे  

१८ राज्य व केंद्र सरकारी  केंद्रे

३००  पालिकेची केंद्रे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 7 percent of vaccinations in mumbai are done at private centers zws

ताज्या बातम्या